धर्मा भोसलेंचाही राजीनामा
By admin | Published: May 21, 2014 01:01 AM2014-05-21T01:01:36+5:302014-05-21T01:01:36+5:30
ब्लॉक अध्यक्षांचेही राजीनामे : गुरुसिद्ध म्हेत्रे वेटिंगवर
सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली. त्यांच्यापाठोपाठ शहराध्यक्ष धर्मा भोसले आणि ब्लॉकच्या पाच अध्यक्षांनीही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठविले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने पक्षात नाराजीची लाट पसरली आहे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ शहराध्यक्ष धर्मा भोसले, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सिद्धाराम चाकोते, माणिकसिंग मैनावाले, संजय बनसोडे, जाबीर अल्लोळी, डॉ. साहेबराव गायकवाड यांनीही आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत.
--------------------------
म्हेत्रे यांचाही निर्णय राजीनाम्यासाठी पक्षातून येणार्या दबावाला न जुमानणार्या गुरुसिद्ध म्हेत्रे यांनीही अखेर पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तोही काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी आपला राजीनामा दिला. मंगळवारी माळकवठ्याचे सरपंच पंचाक्षरी स्वामी यांनी सभापती इंदुमती अलगोंड यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यांचे लोण मंद्रुपपर्यंत पोहोचले. दक्षिण तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या राजीनाम्यासाठी पक्षातला एक गट सक्रिय होता. परंतु म्हेत्रे त्यांना दाद देत नव्हते. शेळके यांच्या राजीनाम्यानंतर आता म्हेत्रे यांनीही राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह चार-पाच तालुकाध्यक्षांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली असून जिल्हाध्यक्षांनीच पद सोडल्याने त्यांचा राजीनामा कोण स्वीकारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ मे रोजी पक्षाच्या प्रदेश कमिटीची मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचे निमंत्रण तालुकाध्यक्षांनाही असल्याने थेट प्रदेशाध्यक्षांकडेच आपला राजीनामा सोपवणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.
------------------------
तालुकाध्यक्षपदावर काम करताना अडचणी आल्या. परंतु सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठरलो. शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे आता पदावर राहण्यात रस नाही. -गुरुसिद्ध म्हेत्रे, तालुकाध्यक्ष