बावीस वर्षांपूर्वी हरवलेला धर्मेंद्र घरी परतला; झारखंडच्या घरी आईला पाहून ढसाढसा रडला
By रूपेश हेळवे | Updated: March 28, 2025 13:22 IST2025-03-28T13:22:22+5:302025-03-28T13:22:56+5:30
वडील शोधायला गेले; परतलेच नाहीत पण रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवली मानवता

बावीस वर्षांपूर्वी हरवलेला धर्मेंद्र घरी परतला; झारखंडच्या घरी आईला पाहून ढसाढसा रडला
रूपेश हेळवे, लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: झारखंडचा धर्मेंद्र मित्रांबरोबर गुजरात पाहायला निघाला; पण सोलापुरातच भरकटला... मित्र गावी गेले. नंतर खूप शोधलं; पण सापडला नाही. तब्बल बावीस वर्षे गेली. रेल्वे कर्मचारी रमेश मीना यांना हा मनोरुग्ण रस्त्यावर दिसला अन् त्यांनी चौकशी करून धर्मेंद्रसिंगला गावी पाठविण्याची व्यवस्था केली.
धर्मेंद्रसिंग सात रस्ता परिसरात उन्हात-पावसात तसेच पडून राहत होता. ही बाब सोलापुरातील रमेश मीना यांना कळाली. त्यांनी धर्मेंद्रशी मैत्री केली. त्याला बोलतं केलं. गावाचं नाव सांगण्याइतका तो आत्मविश्वासानं बोलू लागला; मग काय सारंच सोपं... धर्मेंद्रच्या आईला व्हिडीओ कॉल लावला अन् माय-लेक एकमेकांकडे पाहून फक्त रडतच राहिले.
धर्मेंद्रसिंग हा झारखंडमधील बोकारो जिल्ह्याचा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मीना यांनी बोकारो जिल्ह्यातील नारायणपूर येथील सब इन्स्पेक्टर अनिल लिंडा यांच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. लिंडा यांनी घरी जाऊन व्हिडीओ कॉल लावून धर्मेंद्रच्या आईला फोन दिला. त्यानंतर धमेंद्रचा भाऊ झारखंडहून त्याला नेण्यासाठी सोलापुरात आला. नुकतेच त्याचे पोखरिया गावात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
वडील शोधायला गेले; परतलेच नाहीत
धर्मेंद्रला शोधून आणल्याशिवाय घरी येणार नाही, असे म्हणत दोन वर्षांनंतर त्याचे वडील गेले. अद्यापही ते परतले नाहीत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
मी त्याची दाढी कटिंग केली. त्याच्यासोबत जवळीक वाढवण्यासाठी दररोज जाऊन त्याला भेटत होतो. त्याला काही आठवत नव्हते. त्याने एका दिवशी राज्याचे, त्यानंतर जिल्ह्याचे आणि गावाचे नाव असा पत्ता सांगितला. पोलिसांचेही सहकार्य मिळाले.
-रमेश मीना, रेल्वे कर्मचारी