धसका कोरोनाचा; सोलापुरातील स्मशानभूमींमध्ये रोज ४०-५० प्रेतांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:41 AM2020-06-03T11:41:48+5:302020-06-03T11:44:33+5:30
मोदी स्मशानभूमीतील संख्याही वाढली, उपचारात दिरंगाई होत असल्यानेही अनेकांचा मृत्यू
सोलापूर : एकीकडे कोरोनाचा जबरदस्त धसका आणि दुसरीकडे शहरातील बहुतांश हॉस्पिटलकडून उपचारात दिरंगाई यामुळे सोलापुरात एक भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरातील आकडेवारी पाहिल्यास सोलापुरात मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वय वर्षे ५० पुढील नागरिक एकाएकी मृत्युमुखी पडत आहेत. सोलापुरातील सर्व स्मशानभूमी सध्या हाऊसफुल्ल आहेत. रोज ४० ते ५० प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. इतर वेळेपेक्षा सध्या मृत्युमुखीचे प्रमाण तिपटीने वाढल्याची माहिती सोलापुरातील विविध स्मशानभूमी समिती पदाधिकाºयांकडून मिळाली आहे.
अक्कलकोट रोड सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी समितीचे सचिव प्रवीण मुसपेट सांगितले, २७ मे रोजी मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद होती. त्यामुळे २८ व २९ मे रोजी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अक्कलकोट रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात इतर रुग्णांचाही समावेश आहे.
पूर्वी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत रोज दोन ते तीन प्रेतांवर अंत्यसंस्कार व्हायचे. तेच आज रोज दहा ते बारा प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यामुळे प्रेत जाळण्यासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. अंत्यविधी झाल्यानंतर स्वच्छतेसाठी स्मशानभूमीत पाण्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यसंस्कार करण्याकरिता नागरिकांची गर्दी होत असल्याने स्मशानभूमीतील कर्मचाºयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे.
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संचालक शिवराज दासी सांगतात, पद्मशाली स्मशानभूमीत देखील रोज सात ते आठ मृतांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. हेच प्रमाण पूर्वी दोन-तीन असे होते. मोदी स्मशानभूमीतील कर्मचाºयांनीही रोज होणाºया अंत्यसंस्कारात वाढ झाल्याची माहिती दिली. मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत पूर्वी रोज दोन ते तीन प्रेतांवर अंत्यसंस्कार व्हायचे, तेच प्रमाण आता सात ते आठ झाल्याची माहिती तेथील कर्मचाºयाने दिली आहे. रूपाभवानी मंदिराजवळील लिंगायत स्मशानभूमीत देखील असेच प्रमाण आहे.
या कारणामुळे वाढतेय मृत्यूंची संख्या...
- मृत्यू पावणाºयांमध्ये ५० वयापेक्षा अधिक नागरिकांची संख्या अधिक आहे. यात मधुमेह, रक्तदाब तसेच दम्याचा त्रास असलेल्या वृद्धांचा समावेश आहे. काही वृद्धांनी कोरोनाचा जबरदस्त धसका घेतला आहे. तसेच काही वृद्धांचा खडक उन्हामुळे देखील मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शहरातील बहुतांश खासगी हॉस्पिटल्स सध्या बंद आहेत किंवा एमर्जन्सी रुग्णांवर उपचार करण्यात रुग्णालयाकडून दिरंगाई सुरू आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षतेमुळे तसेच योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने घरातील वृद्धांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक सांगताहेत.
अक्कलकोट रेड येथील भावसार वैकुंठधाम स्मशानभूमीत पूर्वी आठवड्यातून दोन ते तीन नागरिकांवर अंत्यसंस्कार व्हायचे. तेच आता रोज तीन ते चार नागरिकांवर अंत्यसंस्कार सुरू आहे. समाजातील वृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांनी घाबरू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- राजकुमार हंचाटे, नगरसेवक