दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:01 PM2018-03-28T17:01:59+5:302018-03-28T17:01:59+5:30
ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता, जिल्हा परिषदांच्या शाळांचे बांधकाम आणि दुरूस्ती, पीककर्ज वाटप, पाणंद रस्ते याबाबत मागण्या केल्या.
सोलापूर : तालुक्यातील सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्याच्या प्रश्नांवर चर्चा करीत त्यांच्याशी संवाद साधला. प्रलंबित एकरूख उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.
सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी विधानभवनात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आवर्जून भेट घेतली. आपल्या गावचे प्रश्न आणि विकासकामांच्या मागण्यांची निवेदने संबंधित मंत्र्यांना सादर करीत गावाच्या विकासावर चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान सरपंच संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीतून तालुक्यातील गरजूंना सर्वाधिक निधी मिळू शकल्याने अनेकांना आधार मिळाल्याचे सांगितले. याचवेळी सरपंचांनी स्थानिक विकासकामांची निवेदने मुख्यमंत्र्यांकडे सोपविली. यात ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता, जिल्हा परिषदांच्या शाळांचे बांधकाम आणि दुरूस्ती, पीककर्ज वाटप, पाणंद रस्ते याबाबत मागण्या केल्या.
मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष पंडित अंबारे, उपाध्यक्ष सुशीला ख्यामगोंडे, सचिव विजयालक्ष्मी व्हनमाने, खजिनदार धर्मराज राठोड, मुख्य संघटक सिद्धाराम हेले, पंचायत समिती सदस्य एम.डी. कमळे, सरपंच शकील मकानदार, सुरेश देशमुख, श्यामराव हांडे, कलावती गिराम, सुरेश राठोड, ज्योती गावडे, आप्पासाहेब चितापुरे, रुक्माबाई माशाळे, रवींद्र कोळी यांच्यासह इंद्रजीत लांडगे, खंडोजी सुरवसे यांचा समावेश होता. पदाधिकाºयांनी विधीमंडळ कामकाज जाणून घेतले.
एकरूख योजना मार्गी लावा
- तालुक्यातील एकरूख उपसा सिंचन योजना ‘सुप्रमा’ नसल्याने अनेक वर्षे प्रलंबित आहे. ही योजना लवकर मार्गी लागली तर सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. योजनेतून वगळलेल्या १४ गावांचे सर्वेक्षण करून त्यांचा योजनेत नव्याने समावेश करावा, ही योजना तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यामुळे आमची मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची भेट होऊ शकली़ आमचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविता आले़ याचा आनंद वेगळाच आहे़ अनेक विषयांवर आमची चर्चा झाली़
- सिद्धाराम हेले,
सरपंच, तांदुळवाडी़