नारायण पाटलांनी स्वत:च्या गावचा तलाव तरी पाण्याने भरला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:27+5:302021-07-16T04:16:27+5:30
करमाळा : दहिगाव सिंचनसाठी ९० कोटींचा निधी मंजूर केला, असे सांगणाऱ्या माजी आमदाराने पाच वर्षाच्या स्वतःच्या आमदारकीच्या ...
करमाळा : दहिगाव सिंचनसाठी ९० कोटींचा निधी मंजूर केला, असे सांगणाऱ्या माजी आमदाराने पाच वर्षाच्या स्वतःच्या आमदारकीच्या कालावधीत दहिगाव उपसा सिंचन योजनेतून स्वतःच्या लव्हे गावातील विठोबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला का ? असा सवाल पंचायत समितीचे माजी सदस्य, संजयमामा शिंदेसमर्थक विलास पाटील यांनी केला.
दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू केल्यानंतर तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी त्या योजनेचे एक आवर्तन दिले. परंतु पाणीपट्टी म्हणून प्रत्येक गावातील लोकांकडून वर्गणी गोळा केली. गेल्या दोन वर्षांपासून संजयमामा शिंदे यांनी सातत्याने पाच आवर्तने दहिगाव उपसा सिंचन योजनेची दिली आहेत. त्याबदल्यात एक रुपयाही लोकवर्गणी त्यांनी गोळा केलेली नाही. उलट कृष्णा खोरे महामंडळाकडून या योजनेचे तब्बल अडीच कोटी रुपयांचे वीजबिल शासनाला भरण्यास भाग पाडले. माजी आमदार पाटील यांच्या कारकीर्दीतील ७१ लाख थकीत वीजबिलही संजयमामा यांनी भरल्याचे लोकांना ज्ञात आहे.
माजी आ. पाटील यांच्या काळात राजकारणाचा भाग म्हणून नारळ फोडून नवीन चारी खोदली जायची. पाण्याचे पूजन केले जायचे. त्यावेळी फक्त चारी ओली करण्यासाठी पाणी दिले जात होते. आता आ. संजयमामा शिंदे यांच्या कारकिर्दीत पिकांसाठी पाणी दिले जात आहे. त्याचे फलित म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये बारमाही पिकांचे क्षेत्र वाढलेले आहे.
---
लोकांना आता दहिगाव योजनेबद्दल विश्वास वाटू लागला
लोकांना दहीगाव योजनेबद्दल आत्ता विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे आपण दहिगाव योजनेसाठी खूप मोठे काम केले, हा दावा पाटील यांनी करू नये. आत्मपरीक्षण करून स्वत:च्या चुका त्यांनी शोधाव्यात, असा सल्लाही पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी माजी आमदार पाटील यांना दिला आहे.