सोलापूरकरांनो ऐकलं का; झटपट लस घ्यायची असेल तर पुढाऱ्यांचा वशिला आणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 01:23 PM2021-07-12T13:23:26+5:302021-07-12T13:23:32+5:30
नागरिकांमध्ये संताप : काहीजण शोधतात शॉर्टकट मार्ग
सोलापूर : लसीचा तुटवडा असल्याने सोलापुरात लसीकरण मोहीम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. लस मिळविण्यासाठी कुठे पैशाची लाच दिली जाते, तर कुठे वशिलादेखील लावला जातोय. शहर व ग्रामीण परिसरात राजकीय पुढारी आपले कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वशिला लावून झटपट लस मिळवताहेत. अशा अनेक घटना घडत असल्यामुळे सजग नागरिकांमध्ये या वशिलेबाजीच्या विरोधात चीड निर्माण होत आहे.
सोलापुरात लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लसीकरता लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ही गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. पहाटे तीन वाजल्यापासून लसीकरण केंद्रासमोर रांग लागत आहे. ऑनलाईन स्लॉट बुकिंगकरिता नागरिक मोठ्या संख्येने संकेतस्थळावर उड्या मारताहेत. दोन-तीन दिवसात एकदा स्लॉट ओपन होत असल्याने ऑनलाईन बुकिंग देखील होईना. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग न करताच मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करतायेत.
लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. शनिवारी दुपारी अक्कलकोट रोड येथील सादूल पेट्रोल पंपासमोरील आरोग्य केंद्रात विडी महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण लस मिळत नसल्याने कंटाळलेल्या महिलांनी अक्कलकोट महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महिलांचे स्वयंस्फूर्त ठिय्या आंदोलन मागे हटले.
..................
आतापर्यंत लसीकरण...
- पहिला डोस - ६,२२,९९८
- दुसरा डोस - १,७५,५९३
.......