हातातील गेलं म्हणून नशिबातून गेलं काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:52+5:302021-04-10T04:21:52+5:30
कामती: बेकारीमुळे गाव सोडून दुसऱ्या गावी स्थायिक झाले...मित्रांकडून पैसे जमवून सराफ व्यवसाय सुरू केला...मोठी स्वप्नं उराशी बाळगून व्यवसायाची घडी ...
कामती: बेकारीमुळे गाव सोडून दुसऱ्या गावी स्थायिक झाले...मित्रांकडून पैसे जमवून सराफ व्यवसाय सुरू केला...मोठी स्वप्नं उराशी बाळगून व्यवसायाची घडी बसवण्याचा प्रयत्न चालवला...इतक्यात चोरट्यांनी डाव साधत दुकानातून दागिने पळविले...पाेलिसांच्या मदतीने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला...अखेर जड हात खांद्यावर पडला, कानावर शब्द पडले...हातातील गेलं म्हणून नशिबातून गेलं काय, या वडिलधाऱ्यांच्या शब्दांनी पुन्हा उमेद निर्माण केली.
हा प्रसंग आहे वाघोली (ता. मोहोळ) येथील भीमाशंकर पोतदार यांच्याशी निगडित. पोतदार यांना पत्नी, चार मुली, मुलगा व वडील असा आठ जणांचा परिवार आहे. रोजीरोटीसाठी ते डोणज (ता.मंगळवेढा) सोडून वाघोलीत आले. गावात मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन सोन्याचे दागिने खरेदी केले होते. सध्या लॉकडाऊन असल्याने गावोगावी फिरून नागरिकांना सेवा देत होते. बुधवारी घाईगडबडीत दागिन्यांची पिशवी दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवून घरी गेले होते. सायंकाळी ती पिशवी ड्राव्हरमधून बाहेर काढलीच नाही. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडून १३० ग्रॅम सोने पळविले. पत्नी, मुले, भीमाशंकर हे अश्रू ढाळत राहिले. पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली.
इतक्यात एक जड हात पाठीवर पडला आणि धीर देणारे शब्द कानावर पडले, हातातील गेलं म्हणून नशिबातून गेलं काय ? पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करू. बळ देणारे हे शब्द वडिलांच्या तोंडून पडले. त्यांनी मुलाची समजूत काढली. लॉकडाऊन काळात छोट्या-छोट्या सराफ व्यवसायिकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मात्ऱ हार न मानता त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
---
त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत..
संध्याकाळी नऊपर्यंत दागिने सापडतील, या आशेवर फिरत होते. त्यांच्या जिवाची तगमग पाहता पोलीसही अस्वस्थही झाले होते. त्यांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, तोही त्याच परिसरात घुटमळत राहिला. सोने विकून मित्रांचे पैसे द्यायचे असल्याने त्यांनी पोलीस ठाणे सोडले नाही. शेवटी रात्री नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी त्या दांपत्याची भेट घेतली. तपास यंत्रणा सक्रिय करून दागिने शोधून देऊ असे आश्वासन दिले. दिवसभर अन्नाचा कण न घेतलेले पाेतदार अखेर पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.