सांगोला तालुक्यात बाधित अन् मृतांच्या आकड्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:32+5:302021-04-22T04:22:32+5:30
दरम्यान, तालुका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात सांगोला तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण, बरे झालेले रुग्ण, उपचार ...
दरम्यान, तालुका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात सांगोला तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण, बरे झालेले रुग्ण, उपचार सुरू असलेले रुग्ण यांसह मृत्यूच्या आकड्यांत तफावत दिसून आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची तपासणी, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, निगेटिव्ह संख्या, मृतांची संख्या तसेच बरे होऊन गेलेल्या रुग्णांची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार त्यांच्या अहवालानुसार सांगोला तालुक्यात गेल्या वर्षापासून मंगळवारपर्यंत तालुक्यात ६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सांगोला तालुक्यात ७० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेली आकडेवारी आणि तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेली आकडेवारी यात मोठी तफावत आढळली आहे.
गेले काही दिवस सांगोला शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. शहर व तालुक्यातील पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. मात्र एक वर्षानंतरही तालुका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून येणाऱ्या अहवालातील आकड्यांमध्ये अजूनही तफावत जाणवत आहे.
तालुका आरोग्य विभागाच्या आकडेवारीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७० तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालात ६५ आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन विभाग यांच्याकडून मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचे दिसत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण व बळींची संख्या यातील तफावत पुन्हा समोर आली आहे.
----
साडेतीन हजार रुग्णांची कोरोनावर मात
तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यात मंगळवारी ८६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ६३ हजार ७९५ जणांच्या तपासणीमध्ये ४ हजार १९४ पॉझिटिव्ह रुग्ण तर ५९ हजार ६०७ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील ६१९ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ५०५ जणांनी कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.