वेगळी बातमी; बिनधास्त झोपा; रेल्वे जागवेल ! रेल्वेची ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा

By Appasaheb.patil | Published: October 23, 2022 03:06 PM2022-10-23T15:06:00+5:302022-10-23T15:06:07+5:30

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये सुविधा; रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना दिलासा

Different news; Sleep undisturbed; The train will wake up! 'Destination Alert' facility of Railways | वेगळी बातमी; बिनधास्त झोपा; रेल्वे जागवेल ! रेल्वेची ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा

वेगळी बातमी; बिनधास्त झोपा; रेल्वे जागवेल ! रेल्वेची ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : प्रवाशांनी आता रेल्वेमध्ये आरामात झोप घेतली तरी चालणार आहे. कारण, झोपलेल्या प्रवाशांना त्यांचे इच्छित स्टेशन आल्यानंतर जागं करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. रेल्वे स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आधी ‘वेकअप अलार्म’ पाठवून प्रवाशांना जागं केलं जाणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनेकदा प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांचे इच्छित स्टेशन मागे सुटून जाते व नंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा सुरू केली आहे. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या सुविधेसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. यासाठी रेल्वे प्रवाशांकडून फक्त तीन रुपये आकारले जाणार आहेत.

-------------

कशा प्रकारे काम करतो वेकअप अलार्म

रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर वेक-अप अलार्म पाठविला जाईल. हा अलार्म ट्रेन स्टेशनवर येण्याच्या २० मिनिटे आधी दिला जाईल. जेणेकरून प्रवासी झोपेतून जागे होतील आणि रेल्वेतून खाली उतरण्याची तयारी करतील.

-----------

असा घ्या सुविधेचा लाभ

रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणारा कोणताही प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी त्याला त्याच्या मोबाईलवरून १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर प्रवाशाला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल. यानंतर, वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी सात आणि नंतर दोन हे आकडे दाबावे लागतील. नंतर प्रवाशाला त्याचा १० अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. पीएनआर क्रमांक भरल्यानंतर एक अंक दाबून त्याची पुष्टी करावी लागेल. हे केल्यानंतर प्रवाशाचे इच्छित स्टेशन सेट केले जाईल आणि ते स्थानक येण्याच्या २० मिनिटांपूर्वी त्याला अलर्ट मिळेल. तुम्ही जर रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

------------

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती

आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दररोज शेकडो गाड्या ये-जा करतात. दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते.

----------

Web Title: Different news; Sleep undisturbed; The train will wake up! 'Destination Alert' facility of Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.