धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:40 PM2021-04-20T12:40:34+5:302021-04-20T12:40:40+5:30

दोन दिवसांतील घटना, लोकांमध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दलही भय

Difficult situations; Two women died at the door of the hospital due to lack of beds | धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला

धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला

Next

सोलापूर - ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे शहरातील अनेक रुग्णालये अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. काही जणांनी आपल्या रुग्णालयाबाहेरच ‘बेड उपलब्ध नाही’ असे फलक लावले आहेत. केवळ वेळेवर बेड उपलब्ध न झाल्याने शनिवारी आणि सोमवारी सकाळी दोन महिलांनी रुग्णालयाच्या दारात जीव सोडल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर आणीबाणी ओढवली आहे. लोक रेमडेसिविरसह इतर औषधी मिळविण्यासाठी वणवण करीत आहेत. रेमडेसिविरसाठी केलेला नियंत्रण कक्षही फोल ठरला आहे. तगडा वशिला असेल तरच औषध मिळेल, अशी परिस्थिती आहे. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनएस, गंगामाई, प्राइड, नर्मदा, यशोधरा या मोठ्या रुग्णालयांसह छोट्या रुग्णालयांतील यंत्रणा ऑक्सिजन सिलिंडर वेळेवर मिळविण्यात व्यस्त आहे. अश्विनी, यशोधरा, सीएनएस, मार्कंडेय, प्राइड, नर्मदा, सिव्हिल, बॉइस या हॉस्पिटलमध्ये गेलात की बेड उपलब्ध नाहीत. सकाळी किंवा संध्याकाळी उपलब्ध झाले तर कळवितो, असे सांगितले जाते. पालिकेच्या डॅशबोर्डवर सकाळी बेड उपलब्ध असल्याचे दिसते.

नातेवाइकांना आपल्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी छोट्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर रविवारी केले होते. छोट्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याचा दावाही या दोघांनी केला होता, परंतु ही रुग्णालये ऑक्सिजन व अत्यावश्यक यंत्रणा नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत.

बेडसाठी सायंकाळपासून फिरत होते

छाया लोंढे (६५, रा. जय मल्हार चौक, मातंग वस्ती) या महिलेवर सीएनएसमध्ये उपचार झाले होते. बऱ्या झाल्या म्हणून घरी आणले. शनिवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने कुटुंबीय सीएनएस, मुळे हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु येथे बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळपासून कुटुंबीय बेड शोधत होते. चिडगूपकर हॉस्पिटलच्या दारात शनिवारी रात्री ११.१५ वाजता या महिलेने प्राण सोडले. या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता, असे या भागातील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

सिव्हिलमध्ये जाण्यास नकार दिला...

निर्मला श्रीकांत काळे (५५, रा. जय मल्हार चौक) या महिलेला दोन दिवसांपासून त्रास होता. घराजवळील एका डॉक्टरांकडे उपचार घेतले. कुटुंबीयांनी खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे दाखल करायचा विचार केला, पण सिव्हिलमधील परिस्थिती जाणून असल्यामुळे निर्मला काळे यांनी नकार दिला. कुटुंबीय शुक्रवारी सिद्धेश्वर हॉस्पिटल, मार्कंडेय, उपासे, यशोधरा या रुग्णालयांत चौकशी करून आले. या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी खूपच त्रास होऊ लागल्याने कुटुंबीय उपासे हॉस्पिटलकडे निघाले. सकाळी ७.३० वाजता उपासे हॉस्पिटलच्या दारात रिक्षामध्ये निर्मला यांनी प्राण सोडल्याचे त्यांचा मुलगा राहुल काळे यांनी सांगितले.

याकडे कोण देणार लक्ष

  • रेमडेसिविर मिळत नाही. रुग्णालये नातेवाइकांना इंजेक्शन आणायला सांगतात. नातेवाईक जिल्हाधिकारी, महापालिकेत येतात. आम्ही रुग्णालयांना इंजेक्शन पाठविले आहेत. जेवढी इंजेक्शन आली तेवढीच दिली असे सांगून अधिकारी निघून जातात.
  • -सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. सोलापूरची पुरवठ्याची साखळी तुटू नये यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, परंतु सर्वजण आपल्या पातळीवर काम करीत आहेत. राजकीय नेतृत्व यात कुठेही दिसत नाही.

 

 

Web Title: Difficult situations; Two women died at the door of the hospital due to lack of beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.