डिजीटल इंडिया; ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाइन; ४९ टक्के अजूनही रांगेतच
By Appasaheb.patil | Updated: July 23, 2023 19:31 IST2023-07-23T19:30:54+5:302023-07-23T19:31:14+5:30
बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी १२ लाख ८४ हजार ग्राहकांनी जून महिन्यात वीजबिल भरले.

डिजीटल इंडिया; ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाइन; ४९ टक्के अजूनही रांगेतच
सोलापूर : चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे.
बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी १२ लाख ८४ हजार ग्राहकांनी जून महिन्यात वीजबिल भरले. त्यातील ६ लाख ५६ हजार २४४ (५१ टक्के) ग्राहकांनी विविध ऑनलाईन पर्यायाद्वारे घरबसल्या वीजबिल भरले व ऑनलाईन सूट व पेट्रोलचे पैसे वाचविले. तर ६ लाख २९ हजार ६५५ ग्राहकांनी उन्हातान्हात घराबाहेर पडून, स्वत:चा वेळ व पेट्रोलचा खर्च करुन वीजबिल भरले. त्यातील कुणी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या कामावर उशिरा पोहोचते तर कुणाला अर्धा दिवसाची रजा टाकावी लागते. यातून दुहेरी नुकसानच होते.
आज सर्व शहरात, गावांत ४ जी नेटवर्क पोहोचले आहे. स्मार्टफोन सुद्धा खिशात आहेत. मात्र त्याचा वापर फक्त सेल्फी पुरता न करता दैनंदिन कामे सुकर करण्यासाठी केला तर महावितरणचे वीजबिल वेळेआधी व घरबसल्या भरणे सहज शक्य झाले आहे.