स्वनिधीतून शिक्षकांनी बनवली डिजिटल शाळा; सोलापुरातील झेडपी शाळेचा लुक बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 03:35 PM2021-01-23T15:35:51+5:302021-01-23T15:36:11+5:30
मुंडफणेवाडी झेडपी शाळा : टॅबलेट व स्मार्ट टीव्हीव्दारे डिजिटल अध्ययन
संदीप लोणकर
श्रीपूर : कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना खूप अडचणी येत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने मुलांसाठी टॅबलेट खरेदी करून शिक्षण देण्याचे काम चालू केले. कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेऊन फिजिकल डिस्टन्स ठेवून स्वतःच्या व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांना शिक्षण दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांना शिक्षण तसेच पालकांना मार्गदर्शन केले. माळशिरस तालुक्यातील झेडपी शाळा मुंडफणेवाडीमधील शिक्षक समीर लोणकर व अर्चना वाघ यांनी शिक्षण अविरत चालू ठेवले आहे.
महाळुंग येथील मुंडफणेवाडी झेडपी शाळा असून, त्यामध्ये ३७ पट आहे. शाळेतील शिक्षकांनी मुलांना डिजिटल शिक्षण देण्यास भर दिला आहे. मुलांचे नुकसान होऊ नये व शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी टॅबलेट व स्मार्ट टीव्ही स्वखर्चाने खरेदी करून त्यामार्फत मुलांना डिजिटल शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद झाल्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला असल्याचे मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी यावेळी सांगितले.
गुणवत्ता वाढीसाठी ई-लर्निंगचा वापर...
शाळेतील शिक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण ग्रामीण भागांमध्ये मुलांना मोबाईल, इंटरनेटचा अतिरिक्त खर्च वाढत असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे येथील शिक्षकांनी ऑफलाईन शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी ऑफलाईन अभ्यासक्रम असणारा टॅबलेट खरेदी करण्यास विचार केला. या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व अध्ययन आनंददायी झाले आहे. डिजिटल शाळेमध्ये संगणक ई-लर्निंग, स्मार्ट टीव्ही व टॅबलेट आदी सुविधा उपलब्ध केल्याने गुणवत्तावाढीसाठी ई-लर्निंगचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी सांगितले.
टॅबलेट खरेदीसाठी यांनी केली मदत
यामध्ये कल्पना डोर्ले, पंकज व्होरा, नीलेश दोशी, संतोष कोरे आदी मित्रमंडळ, पालक, शिक्षक, रोटरी क्लब, अकलूज यांच्या मदतीने पंधरा टॅबलेट खरेदी केले. यामधील शिक्षकांनी स्वनिधीतून दहा टॅबलेट घेतले आहेत.
माझा मुलगा आरव हा झेडपी शाळा मुंडफणेवाडी या शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहे. वेगवेगळ्या खेळांमधून, कृतीमधून, टॅबलेटव्दारे शिक्षण देऊन मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते प्रयत्न करत असतात.
- पल्लवी अतुल शिंदे
पालक, महाळूंग
टॅबलेटव्दारे अभ्यासात कार्टून असल्यामुळे आम्हाला तो धडा समजतो. त्यामध्ये सराव परीक्षा व खेळ असल्यामुळे जास्त मजा येते
- वैभव चोरमले,
विद्यार्थी, इयत्ता चौथी, झेडपी शाळा, मुंडफणेवाडी