दिलीप माने यांच्या पुतळ्याचे दहन
By admin | Published: May 25, 2014 12:46 AM2014-05-25T00:46:17+5:302014-05-25T00:46:17+5:30
१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : मुंबईत काँग्रेसच्या झालेल्या चिंतन मेळाव्यात सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव मुस्लीम मतदारांनी मतदान न केल्याने झाल्याचा आरोप आ़ दिलीप माने यांनी केल्याने संतप्त मुस्लीम तरुणांनी नई जिंदगीमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शुक्रवारी दुपारी दहन केले़ याप्रकरणी १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यापैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ लोकसभा पराभवाबाबत २३ मे रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वतीने चिंतन मेळावा आयोजित केला होता़ या बैठकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव मुस्लीम लोकांनी मतदान न केल्याने झाल्याचा आरोप केला होता़ या विधानाच्या निषेधार्थ नई जिंदगी चौकात संतप्त तरुण शनिवारी दुपारी एकत्रित आले आणि आ़ माने यांच्या मुर्दाबादच्या घोषणा देत प्रतिकात्मक पुतळा जाळला़ यानंतर यावेळी एमआयडीसी पोलिसांनी हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला़ पोलीस नाईक इम्रानबशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरिफ जावीद लालकोट, आसिफ महमद हुसेन सय्यद, अमिन अमनउल्ला शेख, ईस्माईल महमद हनीफ शेख, इरफान फकीरअहमद इंडीवाले, अलीशेर अब्दुलरजाक मुदलगी याच्यासह दहा ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ अधिक तपास हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत़