दिलीप मानेंनी दाखविले श्रेष्ठींकडे बोट; शेळके म्हणाले, विधानसभेला बंडखोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:18 PM2019-06-12T16:18:27+5:302019-06-12T16:25:39+5:30
सोलापूर जिल्ह्यातील राजकारण; सोलापूर बाजार समिती सभापती निवडीनंतर राजकीय घडामोडींना आला वेग
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीवर माजी आमदार दिलीप माने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर काँग्रेस गोटातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घातलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीमुळे भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सभापती झाले. शिंदे यांनी शेळके तर पवार यांनी साठे यांच्याबद्दल शब्द दिला होता. पण ऐनवेळी झालेल्या घडामोडीत या दोघांनाही दूर ठेवण्याची खेळी अयशस्वी झाली.
पालकमंत्री देशमुख यांनी अंतर्गत राजकारणाला शह देत बहुमत जमविण्यात यश मिळविले. त्यामुळे शेळके व साठे नाराज झाले. सभापती निवडीवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार माने यांनी मी श्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला. शेळके यांना सभापती करण्याची जबाबदारी श्रेष्ठींची होती असे म्हटले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या या राजकीय खेळीवर टीका केली आहे. झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, दिलीप माने यांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कोणतीच गोष्ट सरळ केली नाही. जाणीवपूर्वक त्यांनी बाजार समितीत राजकारण केले. आता वेळ आल्यावर आम्ही आमची ताकद दाखवू.
श्रेष्ठींपुढे गाºहाणे मांडणार काय असे विचारले असता साठे म्हणाले, आता पोस्टमार्टेम करून काय साध्य होणार आहे. त्यामुळे संधीची वाट पाहणे हेच आता आमचे काम आहे असे उत्तर दिले. बाळासाहेब शेळके म्हणाले, माने यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आता दक्षिण सोलापूरमधून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. विधानसभेला मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली नाही तर नाव सांगणार नाही. काँग्रेसचे नेते शिंदे यांचे निकटवर्तीय नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतही कोण किती निष्ठेने काम केले हे आम्ही पाहिले आहे. काँग्रेस संपविण्याचे काम सुरू असेल तर आम्ही खपवून घेणार नाही.
शिंदे यांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष
च्बाजार समितीमधील पराभवाची कारणमीमासा आता काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत केली जाईल असे एका नेत्याने सांगितले. विधानसभेला ही धोक्याची घंटा आहे. या पराभवाने अनेकांनी विधानसभा लढविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. थेट शिंदे यांना टारगेट करण्याचे धैर्य आत्तापर्यंत कोणीच दाखविलेले नाही. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत यावर चिंतन करून निर्णय घेतला जाणार आहे.