दीनानाथ काटकर यांचे पोलीस संरक्षण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:30+5:302021-02-18T04:39:30+5:30
बार्शी : दीनानाथ काटकर यांना दिलेले विनामूल्य पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी भाजपचे बार्शी शहराध्यक्ष महावीर कदम यांनी ...
बार्शी : दीनानाथ काटकर यांना दिलेले विनामूल्य पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी भाजपचे बार्शी शहराध्यक्ष महावीर कदम यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व मनिष पितळे यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. ९ फेब्रुवारीपासून दिनानाथ काटकर यांचे पोलीस संरक्षण न्यायालयाने काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती महावीर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर विनामूल्य पोलीस संरक्षणाचा वापरत होते. व्यापारी, उद्योजक, सरकारी अधिकारी ,समाजातील विविध घटकात दहशत पसरविण्यासाठी सावकारी धंदा करण्यासाठी करत असल्याचे आणि बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे काटकरविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानादेखील पोलीस पोलीस संरक्षण देण्यात आल्याचा आरोप महावीर कदम यांनी केला होता. काटकर हे कोणत्याही गुन्ह्यात साक्षीदार नाहीत. त्यांच्या जीवितास कोणापासूनही धोका नाही.असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
काटकर यांच्या वतीने युक्तिवाद करताना अभिषेक कुलकर्णी यांनी स्वत:चे अशिल विविध कार्यालयात अनेक अर्ज केल्याचा मुद्दा मांडत त्यांच्या जीविताला धोका असल्याचा मुद्दा मांडला. यासाठी पोलीस संरक्षण कायम ठेवावे असा युक्तिवाद केला.
यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने दीपक ठाकरे यांनी काटकर यांनी अर्ज करून संरक्षण मागणी केली होती त्यावर समितीने निर्णय घेऊन पोलीस संरक्षण दिल्याचा मुद्दा मांडला. त्यावर मा. न्यायमूर्तींनी दहा कोटी जनता तुमच्याकडे अर्ज करून पोलीस संरक्षणाची मागेल, त्या सर्वांना संरक्षण देणार का, असा प्रश्न केला. संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ फोनद्वारे विचारणा करून पोलीस संरक्षण काढून घेणार आहात की नाही याबाबत विचारणा करा, अन्यथा आम्ही हस्तक्षेप करून आदेश करू. मुख्यसचिव, गृहसचिव यांना नोटीस काढू अशा भाषेत न्यायालयाने ठणकावल्याचे कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यानच्या, काळात सरकार पक्षाने सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना न्यायालयातील सुनावणी दरम्यानचा इतिवृत्तांत सांगून काटकर यांच्या संरक्षणाबाबत पोलिसांकडे भूमिका विचारली. त्यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाने ९ फेब्रुवारी पासून काटकर यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात येईल, असे न्यायालयासमोर मान्य केले.
याचिकाकर्ते कदम यांच्यावतीने ॲड अशोक सरोगी यांनी तर सरकार पक्षाच्यावतीने दीपक ठाकरे, एस. डी. शिंदे यांनी तर हस्तक्षेपकर्ता लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंता सोनवणे यांच्यातावतीने बाळकृष्ण जोशी, वीरेंद्र पेठे, आरती देवधर यांनी काम पाहिले.