ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर थेट कारवाई; साखर आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 09:09 AM2021-10-19T09:09:07+5:302021-10-19T09:09:31+5:30
साखर आयुक्तांनी दिले राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना आदेश
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादकांकडे पैशांची मागणी होत आल्यास थेट कारवाई करा असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्वच सहकारी व खासगी साखर कारखान्यांना दिले आहेत. साखर आयुक्तांच्या या निर्णयाबाबत ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीकरीता पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर आयुक्त कार्यालयास मोठ्या प्रमाणात झाल्याने साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणी करताना, पिक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी कारणे सांगून तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतक-यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास आल्या आहेत.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकरयांना होणेकरिता प्रसिद्धी द्यावी. तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीत मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा.असे आवाहन केले आहे.
राज्यात चालू २०२१-२२ गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे चार ते पाच महिन्यांत गाळप होईल इतकी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता आहे. इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे
........................................
शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही. याची साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, कार्यकारी सचालक यांनी दक्षता घ्यावी. अशा स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करणेसाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिका-यांची नेमणूक करावी.
- पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक (साखर)