पदवी अभ्यासक्रमासाठी आता थेट विद्यापीठात मिळणार प्रवेश!
By संताजी शिंदे | Published: May 24, 2024 06:47 PM2024-05-24T18:47:48+5:302024-05-24T18:48:19+5:30
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे.
बीएससी पदवी अभ्यासक्रमांसाठी या विषयांची उपलब्धता
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर बीएससी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. याकरिता मॅथेमॅटिक्स, स्टॅटटिक्स कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनवोर्मेन्ट सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहे.