सोलापूर जिल्हा बँकेच्या २०८ शाखांमधून शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचे थेट पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 07:52 PM2022-01-30T19:52:58+5:302022-01-30T19:53:20+5:30
थेट पीक कर्ज योजनेच्या जनजागृतीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व २०८ शाखांमधून शेतकऱ्यांना तब्बल ३६ कोटी १४ लाख रुपयांचे थेट पद्धतीने अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे या अनोख्या थेट पीक कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डिसीसी बँकेचे मंगळवेढा तालुका पालक अधिकारी शब्बीर मुजावर यांनी केले.
सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे डिसीसी बँकेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना थेट पद्धतीने अल्पमुदत पीक कर्ज योजनेची माहिती देताना मुजावर बोलत होते. याप्रसंगी मंगळवेढा शाखेचे बँक इंस्पेक्टर बी, डी राजमाने, सिनियर बँक इन्स्पेक्टर बी एस सोमगोंडे, बँक इंस्पेक्टर सी एम बोबलादे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापुराया चौगुले दामाजी कारखान्याचे माजी संचालक जालिंदर व्हनूटगी माजी सरपंच संतोष सोनगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासो मलगोंडे, माजी उपसरपंच गंगाधर काकणकी, विकास सेवा सोसायटी चे नूतन चेअरमन महादेव चौगुले यांच्यासह नूतन संचालक उपस्थित होते.
यावेळी मुजावर पुढे म्हणाले, प्रशासक शैलेश कोथमिरे , सरव्यवस्थापक मोटे , व्यवस्थापक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखी अशी थेट पीक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने अनोखा उपक्रम राबवित बँकेचे अधिकारी वर्ग आपल्या गावापर्यंत येऊन याबाबत माहिती देत आहेत, सदरहू या योजनेचा लाभ घ्यावा, या योजनेची माहिती आपणास समजावी, यासाठी गावोगावी शेतकरी मेळावा घेत आहोत, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बँकेतून थेट कर्ज मिळत आहे.
-----------------------------------
शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ
एक वर्षाच्या आत घेतलेल्या कर्जाला तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज आकारले जाणार आहे. तीन लाख ते पाच लाख कर्जाच्या रकमेस एक वर्षानंतर दहा टक्के व्याज आकारले जाईल, या कर्ज योजनेत महत्वाची बाब शेतकन्यांना जामीनदाराची आवश्यकता नाही, बँकेच्या नियमानुसार शेतकऱ्यांना थेट रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल, शेअर्स रकमेपोटी कोणतीही कपात घेतली जाणार नाही, नाममात्र सभासद असणे आवश्यक आहे असे पालक अधिकारी मुजावर यांनी सांगितले.
अशी लागणार कागदपत्रे
थेट पीक कर्जासाठी कर्जदाराचे नोंदणी कृत गहाणखत आवश्यक इतर वित्तीय संस्थांचा बाकी दाखला आवश्यक, कर्जदाराचे बँकेच्या शाखेमध्ये व्यवहार असणे आवश्यक, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेमध्ये समावेश असतील. या कर्जासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड व पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, अर्जदाराचे दोन फोटो, जमिनीचा सातबारा, आठ अ, उतारे, सांगड पद्धतीने ऊस व फळ पिकांचे वसुलीचा अधिकार पत्र कर्ज मागणी अर्जासोबत विविध नमुन्यातील कायदेशीर दस्त, सिबिल बाबतची कागदपत्रे, अशी मोजकी कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी बँकेस संपर्क साधावा, हे कर्ज आपणास त्वरित मिळू शकते, असेही आवाहन मुजावर यांनी केले.
ज्या शेतकऱ्याकडे कोणत्याही वित्तीय संस्थेचे पिक कर्ज बाकी नाही, असे सर्व शेतकरी योजने अंतर्गत पात्र असतील, कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार पेक्षा जास्त ते पाच लाखापर्यंत आपणास कर्ज पुरवठा केला जाईल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या डिसीसी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा
- शब्बीर मुजावर , पालक अधिकारी मंगळवेढा