अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या गावांत थेट लक्षवेधी लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:21+5:302021-01-14T04:19:21+5:30
नागणसूर येथे यंदाही प्रचंडे विरुद्ध गंगोंडा, कळसगोंडा, डोंगरीतोट, थंब, अशा अनेकांनी एकत्र येऊन मागील अनेक वर्षे गावावर अंकुश ठेवलेल्या ...
नागणसूर येथे यंदाही प्रचंडे विरुद्ध गंगोंडा, कळसगोंडा, डोंगरीतोट, थंब, अशा अनेकांनी एकत्र येऊन मागील अनेक वर्षे गावावर अंकुश ठेवलेल्या प्रचंडे यांना हरवण्यासाठी जिवाचे रान केले आहे. त्याच ताकदीने प्रचंडे यांनीसुद्धा या सर्वांना आव्हान दिले आहे.
जेऊर या गावचे राजकारण मागील तीन पिढ्यांपासून पाटील कुटुंबाभोवती फिरत आहे. यंदा येथे पहिली निवडणूक दिवंगत माजी आमदार महादेवराव पाटील यांच्या अनुपस्थित होत आहे. यंदाही झेडपी सदस्य मल्लिकार्जुन पाटील विरुद्ध बंदेनवाज कोरबू यांच्या गटात लढत होत आहे.
वागदरीत माजी जि.प. सदस्य विजयकुमार ढोपरे विरुद्ध श्रीशैल ठोंबरे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे. काझीकणबस येथे मजगे, मुनाळे, धर्मसाले यांची यापूर्वी सतत सत्ता असायची. दहा वर्षांपासून यांच्याविरुद्ध सत्ताधारी आकसापुरे यांच्या गटात कलगीतुरा सुरू आहे. भोसगे येथे पं.स. सदस्य आनंदराव सोनकांबळे, दत्ता डोंगरे विरुद्ध श्रीशैल बिराजदार, मलकणा सगर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. संगोगीत पारंपरिक माजी सरपंच बसय्या गुत्तेदार विरुद्ध हळेप्पा खेड यांच्या गटात जोरदार टक्कर आहे. मिरजगीत सरपंच गोपीचंद लोंढे विरुद्ध माजी सरपंच वंदना लोंढे यांच्यात यंदाही तशीच चुरस आहे. किणीत अशोक पाटील, आणप्पा आळळीमोरे, मल्लिकार्जुन साखरे या प्रस्थापित गटाविरुद्ध अमोल हिप्परगी तरुण गटाला विद्यमान सरपंच दिगंबर पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे चुरस निर्माण झाली आहे. अशाच पद्धतीने तालुक्यात अनेक गावांत ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीने होत आहे.