२१ गावांत थेट तर एका गावात तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:01+5:302021-01-14T04:19:01+5:30
मंगळवेढा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १८६ जागांसाठी ४६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २१ गावांमध्ये दुरंगी लढत होत असून, ...
मंगळवेढा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १८६ जागांसाठी ४६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २१ गावांमध्ये दुरंगी लढत होत असून, मरवडे या एकमेव गावामध्ये तिरंगी लढत होत आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या तालुक्यामध्ये अवताडे, आ. परिचारक, स्व. आ. भालके आदी गट कार्यरत आहेत. ही निवडणूक या गटांसाठी येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने रंगीत तालीम ठरणार आहे. तालुक्यातील केवळ मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर २२ ग्रामपंचायतींमधील २८ सदस्य बिनविरोध झाले आहे. भोसे ग्रामपंचायतीच्या १५ पैकी १० सदस्य बिनविरोध झाले असून, ५ जागांसाठी निवडणूक लागली आहे, तर अपात्र अर्जावरून घेतलेल्या हरकती उच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत.
मरवडे येथे तिरंगी लढत लागली असून, चुरूशीची झाली आहे. नदीकाठच्या तामदर्डी, तांडोर, अरळी, सिद्धापूर या गावांतील राजकीय आखाडा तापू लागला आहे. तशीच चुरस नंदेश्वरमध्ये सुरू आहे. सिद्धापूर येथे एकत्र लढलेले नेते एकमेकांविरोधात असून, बोराळे येथेही तशीच परिस्थिती आहे. झेडपीचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी एक जागा बिनविरोध केली आहे. हुलजंतीत आवताडे गटाने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. डोणज येथे प्रथमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आखाड्यात सहभाग घेतला. लेंडवे चिंचाळे येथे स्व. आ. भालके व आवताडे गटात चुरस लागली आहे. घरनिकी येथे निम्म्याहून अधिक जागा बिनविरोध झाल्या. मतदारांना खुश करण्यासाठी निवडणुकीत नेत्यांचा कस लागणार आहे.