सक्षम विकास सोसायट्यांच्या सभासदांसाठी थेट कर्ज योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:51 PM2020-08-03T12:51:59+5:302020-08-03T12:53:57+5:30
नाबार्डकडे प्रस्ताव सादर; सोलापूर पहिला लाभार्थी जिल्हा ठरणार
अरुण बारसकर
सोलापूर : आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांच्या अखत्यारीत सक्षम विकास सोसायट्यांच्या शेतकरी सभासदांसाठी राज्य मध्यवर्ती (शिखर) बँक स्वनिधीतून थेट कर्ज देणार आहे. तसा प्रस्ताव नाबार्डकडे मंजुरीसाठी सादर झाला आहे. या नव्या प्रायोगिक तत्त्वावरील योजनेचा सोलापूर जिल्हा पहिला लाभार्थी ठरणार आहे.
शेतीवर येणाºया संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडतो आहे. पर्यायाने बँकांची थकबाकी वाढते. वसुलीच होत नसल्याने राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीतून बाहेर येत नसल्याचे चित्र आहे. या बँका शेतकरी सभासदांना पर्यायाने शेतकºयांना एक रुपयाही कर्ज देऊ शकत नाहीत. राज्य सरकारने दोनवेळा कर्जमाफी देऊनही जिल्हा बँका तोट्यातून बाहेर आल्या नाहीत. याच बँकांच्या काही विकास सोसायट्या मोठ्या प्रमाणावर थकबाकीत असताना मात्र काही सोसायट्या संपूर्ण वसुली करुन जिल्हा बँकांची परतफेड करीत आहेत. अशा सक्षम विकास सोसायट्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांकडे पैसे नाहीत.
नाबार्डही जिल्हा बँक गृहीत धरुन कर्जपुरवठा करते त्यामुळे सक्षम विकास सोसायट्यांचे सभासदही कर्जापासून वंचित राहतात. असा प्रकार राज्यभरात असल्याने थेट विकास सोसायट्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव आ. सुभाष देशमुख यांनी ठेवला होता; मात्र त्याला नाबार्डने मंजुरी नाकारली होती. आता नाबार्डऐवजी राज्य बँक स्वनिधीतून या सक्षम विकास सोसायट्यांसाठी कर्ज देण्यास तयार आहे; मात्र त्यास नाबार्डची परवानगी आवश्यक आहे.
व्याजदर एक टक्का कमी असणार
सध्या राज्य बँक ९.५० (साडेनऊ) टक्क्याने जिल्हा बँकांना पैसे देते. व्याजदर कमी करण्याची मागणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली आहे. अशीच मागणी राज्यातील अन्य राज्य बँकांकडून आली आहे. याचा विचार केला असून सध्यातरी एक टक्का (८.५०) व्याज आकारले जाईल असे राज्य बँकेने प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
१०० टक्के परतफेड करणारे शेतकरी व विकास सोसायट्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य बँक स्वनिधीतून नवीन योजना सुरू करीत आहे. व्याजदर कमी करुन प्रथम जिल्ह्यासाठी व नंतर राज्यातील जिल्हा बँकांना ही योजना राबविली जाणार आहे. थ्रीटायर सिस्टीमने कर्ज देण्याची नाबार्डची भूमिका असल्याने ही नवी योजना राज्य बँक सुरू करतेय.
- विद्याधर अनास्कर
प्रशासक, राज्य बँक(शिखर)