आईच्या योगदानामुळे मिळाली जीवनाला दिशा : राजेंद्र भारूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:03 PM2019-07-16T12:03:12+5:302019-07-16T12:03:17+5:30
गुरूपोर्णिमा विशेष;
राजकुमार सारोळे
सोलापूर : माझ्या जीवनात तीन गुरूंना महत्त्व आहे. पहिली गुरू माझी आई कमलाबाई. तिने माझ्या जीवनाला दिशा दिली असा अनुभव सांगताहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड.
धुळे जिल्ह्यातील साक्री या आदिवासी पाडातील भारुड यांचे लहानपणीचे जीवन. अगदीच छोटे असताना वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या आईची साथ सोडली. घरात कमालीचे दारिद्र्य. पोटाची भूक भागविण्याची चिंता, अशा परिस्थितीत तीन मुलांना घेऊन कमलाबाई गंभीरपणे उभ्या राहिल्या. स्वत: अशिक्षित असताना आपल्या मुलांना शिकवायचे ही जिद्द डोळ्यासमोर, समाजाची पर्वा न करता मिळेल ते काम करण्याची तयारी केली.
राजेंद्र सरकारी शाळेत जाऊ लागले. गावात कसे वागायचे याचे धडे व संस्कार आईनेच दिले. पाचवीला नवोदय विद्यालयाला क्रमांक लागला. त्यामुळे गाव सोडून जावे लागले. त्यावेळी कमलाबार्इंचे डोळे पाणावले. पोटचा गोळा आपल्यापासून १५० किलोमीटर दूर जातोय. डोळ्यातील अश्रू लपवून त्यांनी राजेंद्र यांना निरोप दिला. आईच्या डोळ्यातील अश्रू ते विसरू शकले नाहीत. शिकून खूप मोठ्ठं व्हायचे आणि आईच्या कष्टाचे पांग फेडायचे या जिद्दीने ते नवोदय शाळेत दाखल झाले. दहावी आणि त्यानंतर बारावीला चांगल्या मार्काने पास होऊन मेडिकलला नंबर लागला. एमबीबीएस करून डॉक्टर झाले तरी आईचे स्वप्न होतं बेटा कलेक्टर झाला पाहिजे.
एमबीबीएसनंतर जिद्दीने आयएएस झाले व त्यानंतर सरकारी गाडीने गावी गेल्यावर आईला आनंद झाला. या आठवणी सांगतानाच डॉ. भारुड यांनी आपल्या जीवनाचा शिल्पकार व गुरू म्हणून आईला स्थान असल्याचे नमूद केले. आजही व्यावहारिक काहीही निर्णय घ्यायचे झाल्यास आईचा सल्ला घेतो असे त्यांनी सांगितले.
गुरुजींना अभिमान वाटतो
शाळेतील माझे पहिले गुरू देवरे, पगारे आणि भारती मॅडम असल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. सुटीत गावाकडे गेलो की त्यांची भेट घेतो. त्यांनी शाळेत केलेल्या मार्गदर्शनामुळे मी ही झेप घेऊ शकलो. प्रत्येक माणसाच्या जीवनात पहिला गुरू आई आणि नंतर शाळेतील शिक्षक व पुढे काम, व्यवसायात गुरू भेटतात. माझ्या गावातील निसर्ग हाही माझा तिसरा गुरू आहे. हिरवेगार डोंगर, ओढे, नाले असा सर्वसंपन्न निसर्ग माझा सोबती होता.