संचारबंदीचा गैरफायदा; दारूच्या होम डिलेव्हरी जाहिरातीद्वारे मद्यपींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:15 PM2020-05-01T15:15:34+5:302020-05-01T15:17:07+5:30
गुगल पे वरून पैसे पाठवले; मद्य मिळाले नाही तर तक्रार कोणाकडे करायची?
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे दररोज मद्यपान करणाºयांची पुरती पंचायत झाली आहे. काय करावे हा प्रश्न मद्यपींना पडलेला असताना सोशल मीडीयावर आलेली जाहिरात पाहून थोड्या वेळासाठी सुखावलेल्या मंडळींची आॅनलाईन फसवणूक होत आहे. पैसे गेले खरे मात्र दारू मिळाली नाही म्हणून तक्रार कशी करायची हा प्रश्न पडलेल्यांनी सध्या शांत राहणंच पसंत केलं आहे.
२0 मार्चचा जनता कर्फ्यू झाल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. सध्या हॉस्पिटल, मेडिकल, दूध व भाजीपाला वगळता अन्य खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. यामध्ये बीअरबार, परमिट रुम अन् वाईन शॉपचा समावेश आहे. दररोज मद्य पिणाºयांची सध्या पुरती पंचायत झाली आहे. सुरुवातीच्या काळात काही दिवस कशीबशी गरज भागवली. दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे देऊन तळीरामांनी आपली गरज भागवली.
३१ रोजी संचारबंदीचा काळ वाढवून तो दि.१ ते १४ एप्रिलपर्यंत करण्यात आला. दि. १५ ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली होती. आता ही वाढून पुन्हा दि. ३ मेपर्यंत केली आहे. बाहेर पडावे तर पोलीस पकडतात, चोरट्या मार्गाने कुठे मिळेल का याची चौकशी करून मद्यपी घरात शांत बसत आहेत. अशा स्थितीत फेसबुक सर्च करताना मद्यांच्या बाटल्या दाखवून होम डिलेव्हरी करणाºया जाहिराती पाहावयास मिळत आहेत.
ही जाहिरात पाहून मद्यासाठी आसुसलेली मंडळी फेसबुकवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करीत आहेत.
संपर्क केल्यानंतर मोबाईलवरील व्यक्ती कोणता ब्रँड हवा आहे? अशी विचारणा करतो. संपर्क करणारी व्यक्ती ब्रँड सांगितल्यानंतर त्याची किंमत सांगितली जाते. मद्यपी जास्तीत जास्त मालाची मागणी करतो तेव्हा त्याला अर्धे पैसे गुगल पे वरून भरण्यास सांगितले जातात. अर्धे पैसे माल मिळाल्यावर द्या असे सांगून विश्वास निर्माण केला जातो. काही झालं तरी दारू मिळाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मद्यपी गुगल पे व अन्य आॅनलाईन पद्धतीने पैसे पाठवतात. पैसे मिळाल्यानंतर देण्यात आलेला मोबाईल नंबर बंद केला जातो. अशा पद्धतीने सध्या तळीरामांची आॅनलाईन फसवणूक होत आहे.
आॅनलाईन विक्रीला परवानगी नाही: रवींद्र आवळे
- सोशल मीडियावरून अशा जाहिराती दिल्या जात आहेत. मद्याच्या आकर्षक बाटल्या दाखवून लोकांना आकर्षित केले जात आहे. फसवणारी मंडळी ही महाराष्ट्रातील नसून ती परराज्यातील आहेत. एक ग्राहक फसला की मोबाईल नंबर बंद केला जातो. आॅनलाईन वाईन, लिकरची घरफोच सेवा अशा फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. राज्य शासनाकडून आॅनलाईन विक्रीची कोणतीही परवानगी दिली नाही. लोकांनी अशा जाहिरातींना फसू नये असे आवाहन सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी केले आहे.
१00 रुपये मिळाले तरी बस्स...
- सोशल मीडियावर जाहिरात देऊन ग्राहकांना फसवले जाते. एखाद्या ग्राहकाने फोन करून गुगल पे व अन्य आॅनलाईन पद्धतीने किमान १00 रुपये जरी पाठवले तरी त्यांचा उद्देश पूर्ण होतो. नंतर ते ग्राहकांचे फोन घेत नाहीत, नंबर ब्लॅक लिस्टमध्ये तर टाकतात किंवा बंद करतात. एका व्यक्तीकडून १00 रुपयापासून ५ हजार रुपयापर्यंतच्या फसवणुका झाल्याचे समजते; मात्र याबाबत अद्याप कोणी तक्रार दिली नाही.