दिलासादायक! दौंडचा विसर्ग वाढला; उजनी धरण रविवारपर्यंत येणार प्लसमध्ये
By Appasaheb.patil | Published: July 26, 2023 03:29 PM2023-07-26T15:29:01+5:302023-07-26T15:29:28+5:30
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग वाढला आहे.
सोलापूर : सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळी वाढ झाल्याचा आलेख दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरातील पाणीकपात व पाणीटंचाईची भिती आता धूसर झाल्याचे म्हणावे लागेल.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग वाढला आहे. सध्या उजनी धरणात दौंडमधून २४ हजार क्सुसेकचा विसर्ग सुरू आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा १९ टक्के एवढी आहे. उजनीच्या पाणीपातळीत घट झाल्याने महापालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी दुबार पंपिंग करावे लागले मात्र पाणीपुरवठ्यात वाढ झाल्यानंतर महापालिकेने दुबार पंपिंग बंद केले.
सध्या उजनी धरणात ५३.८९ टीएमसी पाणीसाठा असून धरण १२.३ टक्के मायनसमध्ये आहे. खडकवासला धरण ८८ टक्के भरल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळी दररोज वाढ होत असल्याचा आलेख दिसून येत आहे.