दौंडमधून उजनीत ८ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला
By Appasaheb.patil | Updated: July 9, 2024 13:04 IST2024-07-09T13:03:51+5:302024-07-09T13:04:34+5:30
पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागला आहे.

दौंडमधून उजनीत ८ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : उजनी धरण परिसरात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ हाेत आहे. सध्या उजनी धरणात दौंडमधून ८ हजार क्युसेकने पाणी येत असून पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागला आहे.
दरम्यान, मागील चांगला पाऊस न पडल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली होती. उजनीची पाणीपातळी मायनस ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटली होती. मात्र धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमधून विसर्ग येत आहे. मायनस ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणीपातळी सध्या मायनस ३७.३५ टक्क्यांपर्यंत आली आहे. उजनी धरणात सध्या मायनस २०.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. येत्या पंधरा दिवसात धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून व जुलै महिन्याच्या ८ तारखेपर्यंत जिल्ह्यात २३७ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.