सोलापूर जिल्हा परिषदेमधील पार्किंगला लावणार शिस्त; सीईंओं घेणार महत्वाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:49 AM2021-11-26T11:49:30+5:302021-11-26T11:49:38+5:30
ट्रॅफिक जॅम : प्रवेशद्वारावर होतेय वाहनांची गर्दी
सोलापूर : जिल्हा परिषदेत वाहनांची गर्दी होत असल्याने पार्किंगला शिस्त लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. जिल्हा परिषदेत सोमवार व गुरुवारी जिल्ह्यातून सदस्य येतात. त्याचबरोबर कामानिमित्त अनेकजण वाहने घेऊन येत असल्याने जिल्हा परिषदेत वाहनांची गर्दी होत आहे.
चारचाकी वाहने थेट जिल्हा परिषदेच्या पोर्चसमोर येत असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना अडचण येत आहे. त्यामुळे सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषदेतील वाहनतळांची प्रत्यक्ष पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दुचाकी, तर पुढे चारचाकी वाहनांचे वाहनतळ आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांसाठी सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी सोय आहे; पण या ठिकाणी इतर वाहने घुसविली जातात. याशिवाय पोर्चच्या रस्त्यावर वाहने थांबविली जात असल्याचे दिसून आले.
सीईओ स्वामी यांनी पोर्चच्या प्रवेशद्वारावर यापुढे फक्त अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. सदस्यांसाठी स्वतंत्र पार्किंग करण्यात आले आहे. रस्त्यावर व कार्यालयापुढे कोणाचीही वाहने थांबू दिली जाणार नाहीत याची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेत वाहने पार्क करून जिल्हाधिकारी कार्यालय, खरेदी विक्री कार्यालय व बाजारात जाणाऱ्यांचीही संख्या दिसून आली. अशा वाहनांना पायबंद घालण्याच्या सूचना देण्यात आल्या.