शेतासाठी सूट... रुग्णांसाठी रिक्षा; उद्या रात्रीपासून सोलापुरात कडक संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:55 AM2020-07-15T10:55:53+5:302020-07-15T11:00:00+5:30
सोलापूर शहरासह ३० गावांमध्ये असणार कडक संचारबंदी; सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाºयांचा आदेश जारी
सोलापूर : सोलापूर शहरासाठी काढलेल्या संचारबंदीच्या आदेशात नव्या उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शेताला जाण्यासाठी शहरातील लोकांना सूट देण्यात आली असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात रुग्णांसाठी पाच रिक्षांची सोय करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांनी यावेळी पोलिसांना विशेष आदेश दिले आहेत.
अत्यावश्यक कामाशिवाय कोणतीही व्यक्ती बाहेर पडल्यास त्यांचे वाहन जप्त करावे. वाहन परवाना रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पोलीस ठाण्याच्या बाहेर पाच आॅटो रिक्षा उभ्या राहतील, याची दक्षता घ्यावी. अत्यावश्यक कामासाठी या रिक्षांचा वापर करावा. पोलिसांना सहाय करण्यासाठी ४०० लॉकडाऊन सहायक, २६ लॉकडाऊन पर्यवेक्षक, २६ क्षेत्र अधिकारी, २६ लॉकडाऊन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. २६ लॉकडाऊन निरीक्षकांनी शहरातील विविध भागात फिरून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करावी. पोलीस हवालदारासोबत लॉकडाऊन पर्यवेक्षकही थांबतील. कमांडो, क्यूआरटी आदी सुमारे अडीच हजार पोलीस कर्मचारी, २०० अधिकारी, होमगार्ड, विशेष पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त राहणार आहे.
हे बंद असणार...
किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यापारी दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग, राज्य, केंद्र, शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, स्वस्त धान्य दुकाने, बाजार समित्या, क्रीडांगण, मोकळे मैदान, बागा, मॉर्निंग वॉक बंद राहील. हॉटेल, लॉज, रिसोर्ट, मॉल, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, अंडी, मासे विक्री, सर्व शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी, सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक, बांधकामे, चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव, लग्न व इतर समारंभ, मंगल कार्यालय, खासगी आस्थापनांची कार्यालये, धार्मिक स्थळे, बँकेचे नागरिकांचे व्यवहार बंद राहतील.
हे सुरू राहणार...
कारखाने, उद्योग सुरू राहतील, मात्र कामगारांची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था असावी, निवासी व्यवस्था असलेले बांधकाम सुरू ठेवता येईल, हॉटेलमधील पार्सल व्यवस्था, दूध विक्रेत्यांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ६ ते ९, सार्वजनिक व खासगी पशुवैद्यकीय सेवा, रुग्णालये, मेडिकल, चष्म्याची दुकाने, आॅनलाईन औषध वितरण सेवा, कायदेशीर कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी (ओळखपत्र आवश्यक), न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी, आशा कर्मचारी, वर्तमानपत्रे व प्रिंटिंगचे कर्मचारी, पॅरॉमेडिकल, सफाई कर्मचारी, अॅम्ब्युलन्स, टपाल कार्यालय, बँकिंग अंतर्गत आॅनलाईन कामकाज, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्या वाहनांसाठी इंधन पुरविण्यासाठी पेट्रोल पंप सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.
आदेशातही हेही आहे नमूद...
कृषीसंबंधी उद्योग सुरू राहतील, पण संबंधितांना दुचाकीवरून प्रवास परवानगी नसणार आहे. सर्व प्रसारमाध्यमांची कार्यालये सरकारी नियमानुसार सुरू राहतील. कोणालाही अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. अंत्ययात्रा व अंत्यविधीसाठी कोरोना संसर्गाबाबत घालून दिलेल्या अटी लागू असतील. औषध, वीज, पाणीपुरवठा सेवेतील कर्मचारी व अधिकाºयांना परवानगी असेल. सर्व प्रकारची रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक सेवा बंद राहील. महत्त्वाच्या अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंची ने-आण करणे, कायदा व सुव्यवस्थेतील, अग्निशमनच्या वाहनांना परवानगी असेल.
सोलापूर शहरासाठी हे विशेष
शहराबाहेर ज्यांची शेती आहे त्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत येणे-जाणे करावे. यासाठी आपल्या भागातील पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. पशुधन ओला चारा वाहतुकीसाठी पोलीस ठाण्याचा पास आवश्यक. शहरातील सर्वप्रकारचे बांधकाम पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल बंद करण्याचे आदेश आहेत मात्र फूड डिलिव्हरी, होम डिलिव्हरी चालू राहील.
या गावातही संचारबंदी
बार्शी व वैराग शहर, मोहोळ शहर, कुरुल, कामती खु., कामती बु., उत्तर सोलापूर तालुक्यातील तिºहे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, मार्डी, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा व भोगाव तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा, कासेगाव, उळेगाव, विडी घरकूल, कुंभारी, वळसंग, होटगी, लिंबीचिंचोळी, तांदूळवाडी, अक्कलकोट शहर, या गावांमध्ये संसर्ग वाढत असल्याने येथे संचारबंदी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.