सोलापुरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध; सोलापूरसह पाच तालुक्यांचे ९ नमुने ‘एनआयव्ही’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:27 AM2021-03-05T11:27:30+5:302021-03-05T11:28:46+5:30

शोध नव्या स्ट्रेनचा : पंढरपूर, माळशिरस तालुक्यांत का वाढताहेत रुग्ण?

Discovery of new strain of corona in Solapur; Nine samples from five talukas including Solapur to NIV | सोलापुरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध; सोलापूरसह पाच तालुक्यांचे ९ नमुने ‘एनआयव्ही’कडे

सोलापुरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध; सोलापूरसह पाच तालुक्यांचे ९ नमुने ‘एनआयव्ही’कडे

Next
ठळक मुद्देपुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविलेले नमुन्यात शहरातील ४, करमाळा, माळशिरस, माढा, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांचा समावेशपंढरपूर, करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यांत काेरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेदक्षिण सोलापूर तालुक्यातील दिव्यांग शाळेत एकाच वेळी ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नवा स्ट्रेन कार्यान्वित झाला आहे काय हे तपासण्यासाठी शहरासह पाच तालुक्यांतील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, करमाळा या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. विदर्भासारखा या परिसरात कोरोणाच्या विषाणूत बदल झाला आहे काय, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. प्रदीप व्यास यांनी नव्या स्ट्रेनच्या तपासणीबाबत नमुने पाठविण्याची सूचना केली होती. हे नमुने सिव्हिलच्या प्रयोगशाळेने पाठवावेत असे ठरले हाेते. त्यानुसार सिव्हिलच्या प्रयोगशाळेने १ मार्च रोजी ९ नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.

पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविलेले नमुन्यात शहरातील ४, करमाळा, माळशिरस, माढा, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांचा समावेश आहे. पंढरपूर, करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यांत काेरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही आता याच तालुक्यात आढळत आहे. हे तालुके सीमावृत्ती भागातील असल्याने आजबाजूच्या जिल्ह्यांतील लोकांची सतत ये-जा असते. त्यामुळे काेरोना विषाणूत बदल झाला आहे काय हे तपासण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिव्यांग शाळेत एकाच वेळी ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. हे विद्यार्थी महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना लागण कोठून झाली याचा तपास करण्यासाठी ही चाचणी उपयोगी ठरणार आहे. सध्या हे रुग्ण बरे झाले असून, दोन दिवसांनी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. नव्या स्ट्रेनचा तपास करण्यासाठी गरज भासल्यास पुन्हा एकदा असे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागणार आहेत.

रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. गुरुवारी ९३ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्यातील बागेवाडी तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडीतील ज्येष्ठांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजार लपविल्याने मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळेत निदान व उपचारावर भर देण्यात आला आहे.

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

  • अक्कलकोट : १९
  • बार्शी : ६६
  • करमाळा : ७५
  • माढा : ७०
  • माळशिरस : १२४
  • मंगळवेढा : १३
  • मोहोळ : ३२
  • उ. सोलापूर : ११
  • पंढरपूर : ५७
  • सांगोला : ३४
  • द. सोलापूर : २७

Web Title: Discovery of new strain of corona in Solapur; Nine samples from five talukas including Solapur to NIV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.