विवेकी, संयमी, विनयशील नेतृत्व : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:16+5:302021-09-04T04:27:16+5:30
चातुर्वर्ण्य पद्धतीत तळाच्या समाजात जन्म घेणारा, जन्मजात अन्याय सहन करणारा, व्यवस्थेच्या विषमपणात होरपळून निघालेला लहानपणापासून पदोपदी अडथळे, अडचणीचे, ...
चातुर्वर्ण्य पद्धतीत तळाच्या समाजात जन्म घेणारा, जन्मजात अन्याय सहन करणारा, व्यवस्थेच्या विषमपणात होरपळून निघालेला लहानपणापासून पदोपदी अडथळे, अडचणीचे, उपेक्षितांचे जीवन जगणारा माणूस स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा, प्रतिकूल परिस्थितीत उभे राहून स्वत:चा प्रकाश पाडणारा, समाजामध्ये स्वत:चा एक प्रवाह निर्माण करणारा माणूसच स्वत:साठी, समाजासाठी, जन्मभूमी, कर्मभूमीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माणसाची गणना एक सुज्ञ, अभ्यासू, संयमी, विनयशील, विकसनशील, परिवर्तनशील मानव समाजहित, राष्ट्रहित जपणाऱ्या आदर्श व्यक्तींमध्ये होते.
माणसाच्या विकासासाठी शैक्षणिक पात्रता, मानसिक, बौद्धिक क्षमतेचा विकास होणे महत्त्वाचे असते. या गोष्टींचा वापर करून मनुष्य कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास करतो.
उपेक्षित समाजात जन्म घेतलेल्या व्यक्तीवर समाजाच्या वागण्याचा विपरीत परिणाम होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत जगतो, वाढतो आणि हेच माझं नशीब, कर्म समजतो व त्यातच जगतो, मरतो. परंतु काही व्यक्ती या विपरीत परिस्थितीमध्ये स्वत:ला विकसित करून समाजात, देशात, जगात आपल्या परीने आपल्या जीवनाच्या प्रवासाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून सिद्ध होतात व इतरांच्या विकासाचे प्रेरणास्थान होतात. अशीच एक व्यक्ती सोलापुरात, भारत देशात जन्म घेऊन मानव उत्क्रांतच्या विकासाचा एक उत्तम उदाहरण म्हणून स्वत:चे वलय जागतिक पातळीवर निर्माण केले आहे. त्या वलयाचे नाव सुशीलकुमार शिंदे होय.
- अरुण शर्मा
कार्याध्यक्ष, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी