पत्नीच्या तक्रारीनंतर चर्चा; डिसले गुरुजी गेले रजेवर; शिक्षणासाठी अमेरिकेतील वास्तव्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:21 AM2024-09-21T07:21:25+5:302024-09-21T07:21:51+5:30
रणजितसिंह डिसले गुरुजी हे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत.
कुर्डूवाडी (सोलापूर) : ग्लोबल टीचर रणजितसिंह महादेव डिसले यांच्याविरोधात पत्नीने काैटुंबिक हिंसाचाराबाबत लातूर न्यायालयात तक्रार केली आहे. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माढा तालुक्यातील परितेवाडी येथील चव्हाण वस्ती जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले डिसले गुरुजी ०१ ऑगस्ट २०२४ ते ३१ मे २०२५ दरम्यान नऊ महिन्यांच्या असाधारण विनावेतन रजेवर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
रणजितसिंह डिसले गुरुजी हे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्या पत्नीकडून माढा पंचायत व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आतापर्यंत कोणत्याही स्वरुपाची तक्रार प्राप्त नसल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रणजीत डिसले गुरुजी हे १ ऑगस्टपासून नऊ महिन्यांच्या रजेवर गेले आहेत. ते अमेरिकेतील एका विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याचे त्यांच्याकडून रजेवर जाताना सांगण्यात आले. त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केल्याबाबत शिक्षण विभागाकडे माहिती नाही.
-विकास यादव, गटशिक्षणाधिकारी, माढा