सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीत चर्चा, ‘टॅबला हळदी-कुंकू लावायचं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:12 PM2018-11-21T17:12:36+5:302018-11-21T17:17:13+5:30
राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अंगणवाडीतील बालकांचे आधारकार्ड लिंकिंग करण्यासाठी टॅबचे वाटप करण्यात आले, पण गेल्या पाच ...
राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अंगणवाडीतील बालकांचे आधारकार्ड लिंकिंग करण्यासाठी टॅबचे वाटप करण्यात आले, पण गेल्या पाच महिन्यांत सिमकार्डचे वाटप न केल्याने हे काम ठप्प झाले आहे. वैतागून अंगणवाडी ताई म्हणाहेत, या टॅबला हळदी-कुंकू लावून ठेवावं का?
जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांचे आधार लिंकिंग करणे, आॅनलाईन हजेरी व अंगणवाडी सेविकांकडून घेतलेली माहिती भरण्यासाठी पर्यवेक्षिकांना टॅब देण्यात आले आहेत. त्यावर पर्यवेक्षिकांना टॅबवर माहिती भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टॅबवर लॉगिन कसे करायचे, बायोमेट्रिक हजेरी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. टॅबमुळे पर्यवेक्षिकांचे दररोजचे काम, अंगणवाडी भेटी व संकलित माहिती आॅनलाईन भरल्यामुळे कामाचा वेग वाढणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून सर्वच अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि एक अॅप देण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना बालकांचे वजन, उंची, पूरक पोषण आहार पुरवठा, अंगणवाडीतील उपस्थिती, आजार, स्तनदा मातांसाठी पोषण आहार वाटप आदींसंदर्भात नियमित माहिती भरावी लागते. ही माहिती एका क्लिकमध्ये थेट केंद्रीय मंत्रालयापर्यंत पोहोचत असल्याने देशभरातील स्थितीबद्दल आकडेवारी उपलब्ध होते. त्यातून आरोग्यविषयक तसेच पोषणविषयक योजना राबविण्यास मदत होणार आहे.
पुढील टप्प्यात अंगणवाडी सेविकांनाही टॅब देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे अंगणवाडी सेविका लवकरच मोबाईल अॅपच्या माध्यमातून बालकल्याण मंत्रालयासोबत कनेक्ट होणार आहेत. सध्या महाराष्टÑात अशी यंत्रणा नसल्याने अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टरमध्ये बालकांच्या उपस्थितीसह आजार, पोषण आहार, कुपोषणाची श्रेणी आदी माहिती भरावी लागते. या अॅपवर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी भरायची असल्याने रजिस्टरमधील दैनंदिन नोंदी ठेवण्यापासून अंगणवाडी सेविकांना मुक्ती मिळणार आहे. मोबाईल अॅपची योजना राबविण्यासंदर्भात मुंबईमध्ये बैठक झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार २१४ अंगणवाडी सेविका असून, तीन हजार १५६ मदतनीस आहेत. मोठ्या अंगणवाड्या तीन हजार २६९ असून, मिनी अंगणवाड्या ९४५ आहेत.
टॅब झाले खेळणे
- महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब देण्यात आले. बºयाच पर्यवेक्षिकांना टॅब वापराचे ज्ञान नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. लिंकिंग करताना काहींची नावे चुकल्याने टॅब सुरूच झाले नाहीत. नेटवर्किंग नसल्याने आॅनलाईन बायोमेट्रिक हजेरी, बालकांचे आधार लिंकिंग ही कामे झालीच नाहीत. मूळ उद्देश सफल न झाल्याने टॅबचे खेळणे झाले असल्याची प्रतिक्रिया पर्यवेक्षिकांनी व्यक्त केली आहे.
महिला बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आधार लिंक, बायोमेट्रिक हजेरी, अंगणवाडीची माहिती भरण्यासाठी टॅब देण्यात आले आहेत. टॅब लिकिंग करण्याचे काम सुरू आहे. सिमकार्ड मिळविण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी