गोकुळ शुगर्सच्या चेअरमनची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:19+5:302021-02-09T04:25:19+5:30
भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे ...
भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे सकाळपासून घरात नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परंतु थांगपत्ता लागत नव्हता. स्वतःचा मोबाईल पाकीट ओळखपत्र सर्वकाही घरीच ठेवले होते.
मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेल्वे रुळावर एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देहाचे दोन तुकडे झाले होते. ओळख पटण्यासारखी एकही खूण अथवा कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी तातडीने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये हलवले मृत असल्याचे सांगताच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनगृहात त्यांचा मृतदेह ठेवला.
दरम्यान कुटुंबीय बाहेर पडले कुठे अपघात झाला आहे का धर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव अशा ठिकाणीही त्यांनी शोध सुरू केला. पत्नी उषा शिंदे यांनी सोलापुरातील विवाहित मुलगी स्मिता नायडू हिला झाल्या प्रकाराची माहिती देऊन वडील कुठे गेलेत याबाबत शोध घेत असल्याचे सांगितले. मुलगी आणि जावई तातडीने बाहेर पडले. चौकशी करत ते शासकीय रुग्णालयात आले तेथे एक बेवारस प्रेत आत्ताच दाखल झाल्याचे कळले. आत जाऊन पाहताच तो मृतदेह भगवान शिंदे यांचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर दहिटणे ता. अक्कलकोट येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बलभीम, गोकुळ, गणपत असे तीन भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
अशी झाली जडणघडण
बलभीम शिंदे, भगवान शिंदे यांनी ४५ वर्षांपूर्वी लकी चौकात गोकुळ लॉटरीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. कष्टातून आणि जिद्दीने या व्यवसायात त्यांनी जम बसवला. शेती आणि लॉटरी व्यवसायातून जमलेल्या रकमेतून त्यांनी रुद्वेवाडी येथे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत भागीदारीत मातोश्री लक्ष्मी शुगरची उभारणी केली. काही वर्षांतच धोत्री (ता. द. सोलापूर) येथे गोकुळ शुगर्सची उभारणी केली. अलीकडे त्यांनी गावडीदारफळ येथे नवीन कारखान्यासाठी जमीन खरेदी केली होती.
आर्थिक विवंचना असल्याचे कारण
गोकुळ शुगर्स हा साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्याइतकी रक्कमही देता आली नव्हती. त्यामुळे त्यांना गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, या दरम्यान त्यांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत होता. आर्थिक विवंचनेने ते तणावाखाली असावेत, अशी चर्चा होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत
अडचण दूर झाली असताना असे का घडले?
गोकुळ शुगर्स कारखान्यासाठी बँकांमधून कर्ज प्रकरण मंजूर होत नव्हते, मात्र सहा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर एका सहकारी बँकेने कारखान्याला कर्ज देऊ केले. त्यामुळे कारखान्याची आर्थिक अडचण दूर झाली होती. चार दिवसापूर्वी बँकेने रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा ही केली. अडचण दूर झाली असताना त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनाही पडला आहे.