अक्कलकोटच्या ट्रामा केअरसंदर्भात आज आरोग्यमंत्र्यांसमवेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:18+5:302021-05-31T04:17:18+5:30
चपळगाव : अक्कलकोट येथील बहुप्रतीक्षित ट्रामा केअरच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची धडपड सुरू आहे. कोरोनातून ...
चपळगाव : अक्कलकोट येथील बहुप्रतीक्षित ट्रामा केअरच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची धडपड सुरू आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर हे ट्रामा केअर सेंटर सुरू व्हावे यासाठी शुक्रवारी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी स्वतः पुढाकार घेत शिष्टमंडळासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यानंतर पालकमंत्र्यांनी मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकोट येथील ट्रामा केअर सेंटर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक अक्कलकोट तालुक्यातील रुग्णांना जोखमेच्या इलाजासाठी सोलापूर वा इतर ठिकाणी जावे लागते. मात्र हे ट्रामा केअर सेंटर सुरू झाल्यास अक्कलकोटच्या रुग्णांना फार मोठा आधार मिळणार आहे. शुक्रवारी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली झेडपी सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, शिवसेनेचे संजय देशमुख, शिवराज स्वामी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले.
---
ट्रामा केअर लवकरात लवकर सुरू होण्यासंदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीचे शासन असल्याने अक्कलकोट तालूक्याला न्याय मिळेल. सेंटरची निर्मीती झाल्यानंतर याठिकाणी आरोग्य कर्मचा-यांच्या पदाची भरती व्हावी या विषयावर आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सूचना मांडणार आहे.
- सिद्धाराम म्हेत्रे
माजी गृहराज्यमंत्री