जयकुमार गोरेंच्या सोलापूर दौऱ्याची चर्चा; मानेंच्या घरी भोजन, पण स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:42 IST2025-04-04T11:41:31+5:302025-04-04T11:42:31+5:30

माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Discussion on Jayakumar Gore visit to Solapur Food at dilip Mane house but local BJP office bearers absent | जयकुमार गोरेंच्या सोलापूर दौऱ्याची चर्चा; मानेंच्या घरी भोजन, पण स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ

जयकुमार गोरेंच्या सोलापूर दौऱ्याची चर्चा; मानेंच्या घरी भोजन, पण स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ

BJP Jaykumar Gore : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी भाषण टाळले तसेच राजकीय चर्चाही टाळली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दोन दिवसांचा दौरा सुरू आहे. यादरम्यान माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री गोरे आणि दिलीप माने एकाच वेळी आमदार होते, तेव्हापासून त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याने स्नेहभोजन आयोजित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दिली माने यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. कोणतीही भाषणबाजी टाळत पालकमंत्री थेट स्नेहभोजनाला बसले. त्यांच्या समवेत आ. दिलीप सोपल, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, धनश्री पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी जयकुमार माने, पृथ्वीराज माने यांनी उपस्थितांचे आदरातिथ्य केले.

आधीच ठरला होता बेत...

पालकमंत्री गोरे यांचा सोलापूर दौरा निश्चित होतानाच दिलीप माने यांचा स्नेहभोजनाचा बेत ठरला होता. मात्र, या स्नेहभोजनाला भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते नव्हते. बाजार समिती निवडणुकीची चर्चा अपेक्षित होती. मात्र, दिलीप माने यांनी सकाळीच विश्राम गृहात पालकमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

दरम्यान, "दिलीप माने यांच्या घरी मी स्नेहभोजनाला जात आहे. याची कल्पना माझ्या वरिष्ठांना तसेच स्थानिक नेतृत्वांनाही दिली आहे. मी कोठे जातो हे महत्त्वाचे नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या हिताला मला प्राधान्य द्यावे लागेल," असं स्पष्टीकरण जयकुमार गोरे यांनी दिलं आहे.

Web Title: Discussion on Jayakumar Gore visit to Solapur Food at dilip Mane house but local BJP office bearers absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.