नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

By Admin | Published: June 10, 2014 12:29 AM2014-06-10T00:29:36+5:302014-06-10T00:29:36+5:30

माळशिरस तालुका: नऊ गावांमध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

Discussion on Urban Development Plan | नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

googlenewsNext

अकलूज : अकलूजसह इतर नऊ गावांसाठी शासनाने तयार केलेल्या नगररचना विकास आराखड्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने व त्यास ग्रामस्थांनी तक्रारी देऊन घेतलेल्या हरकतींमुळे, आराखडा रद्द होऊन नवीन नगररचना विकास आराखडा तयार करण्याबाबत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
शासनाच्या नगरविकास विभागाने अकलूजसह यशवंतनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, आनंदनगर, माळेवाडी (अ.) या नऊ गावांसाठी नवीन नगररचना आराखडा प्रसिध्द केला होता.
आॅक्टोबर २०१३ मध्ये हा आराखडा प्रत्येक गावामध्ये प्रसिध्द झाल्यानंतर या सर्व नऊ गावांतील ग्रामस्थांची नाराजी व शासनाकडून काही आरक्षित जागा, रस्ते निवडताना झालेल्या तांत्रिक चुका दुरूस्त करून ग्रामस्थांच्या सायीचा नव्याने नगरविकास आराखडा तयार करावा, अशी मागणी सर्वच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली होती.
त्याबाबत आॅक्टोबर २०१३ मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केला होता.
या ठरावाच्या प्रति खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.
उदय सामंत यांनी तत्काळ हा आराखडा रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार व तांत्रिक चुका दुरूस्त करून नव्याने नगरविकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंत डोळस, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मोहनराव लोंढे, नऊ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
----------------------------
या आहेत तांत्रिक चुका
मागील नगरविकास आराखड्यातील महत्त्वाच्या त्रुटी, नियोजन प्रमाणांकानुसार आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत. ती जास्तीची दर्शविण्यात आलेली आहेत, शहरातील समांतर रस्ते खूप कमी अंतरावर दर्शविलेले आहेत, ईदगाहसारख्या प्रार्थना स्थळावरून रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, हनुमान मंदिराच्या जवळ कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अशा तांत्रिक चुकांमुळे सामाजिक सलोखा नष्ट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे तोडगा काढण्यासाठी खा. मोहिते—पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
पुढील नवीन नगरविकास आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे.

Web Title: Discussion on Urban Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.