सोलापूरचे डिसले गुरूजी म्हणाले मला माफ करा; झेडपीच्या सीईंओंना दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 11:42 AM2022-02-02T11:42:31+5:302022-02-02T11:42:37+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांना दिले पत्र
सोलापूर: ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले गुरुजी गेल्या आठवड्यात रजेच्या परवानगीवरून चर्चेत आले होते. पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी प्रलंबित ठेवली म्हणून डिसले यांनी प्रशासनावर मानसिक त्रास व पैसे मागणीचा आरोप केला होता. यावर आरोपाच्या खुलासा करण्यासाठी जिल्हा परिषदेने नोटीस बजाविल्यावर डिसले गुरूजींचे विमान जमिनीवर आले आहे. त्यांनी या आरोपाबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे आता स्पष्ट होतयं.
अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती. दीड महिना शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवला, मानिसक त्रास दिला व पैशाची मागणी केली असा त्यांनी केलेला आरोप व मागील तक्रारीवरून चौकशी समितीने सादर केलेला अहवाल या दोन्ही कारणांनी राज्यभर वादळ उठले होते. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेत करीत जिल्हा परिषद प्रशासनाला तत्काळ परवानगी द्यायला लावली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. प्रसारमाध्यमांसमोर डिसले गुरुजींनी केलेला आरोप प्रशासनाने गांभीर्याने घेतला.
मानसिक छळ कोणी केला व पैसे कोणी मागितले, अशी सीईओ दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस बजावली. यामुळे डिसले गुरुजींच्या अडचणींत वाढ झाली व त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था व विज्ञान केंद्रात हजर राहून प्रशिक्षण दिले का, हा वादाचा मुद्दा पुढे आला. डिसले गुरुजींनी आरोपांबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. ‘आता यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर करीत प्रकरण थांबविण्याची त्यांनी विनंती केली आहे. त्यांच्या माफीनाम्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे. पण या वादाच्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना डिसले गुरुजींचे उत्तर काय असणार आहे, याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे.
दोन पानी पत्र दिले
जिल्हा परिषदेच्या नोटीशीनंतर डिसले यांनी दाेन पानाचे उत्तर दिल्याचे सांगण्यात आले. यात त्यांनी केलेल्या आराेपाबाबत माफी मागितली आहे. यापुढे मी प्रसारमाध्यमापुढे जाणार नाही असेही त्यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले. नोटीशीमुळे डिसले यांची अडचण झाली. त्याचबरोबर डायटच्या पत्रामुळे अडचणीत भर पडली आहे. डायटकडे सेवा न देता त्यांनी तीन वर्षे पगार घेतला. या पगाराचे आता करायचे काय असा नवीन मुद्दा समोर आला आहे.