वकिलाच्या प्रेताची विल्हेवाट; सराफाने दागिने विकत घेतल्याचा उल्लेख गुन्ह्यात का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:18 PM2019-12-11T12:18:11+5:302019-12-11T12:20:18+5:30
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा पोलीस अधिकाºयांना सवाल; चार आरोप प्रस्तावित करण्याच्या सूचना
सोलापूर : सोलापुरात गाजलेल्या अॅड. राजेश कांबळे यांच्या खून खटल्यातील आरोपींवर निश्चित करण्यात आलेल्या आरोपात सुधारणा करण्यात यावी, असे सुचविताना खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वकिलाच्या प्रेताची विल्हेवाट अन् सराफाने दागिने विकत घेतल्याचा उल्लेख गुन्हा नोंदवताना का केला नाही? असा सवाल तपास अधिकाºयांना केला. दरम्यान, चार आरोप प्रस्तावित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
अॅड. राजेश कांबळे यांच्या खूनप्रकरणी नातेवाईकांच्या मागणीवरून सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने ते मंगळवारी सकाळी ११ वाजता सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. संजय उर्फ बंटी खरटमल व अॅड. सुरेश चव्हाण या दोघांनी खुनाचा कट रचला होता. रचलेल्या कटानुसार खून करण्यात आला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि सराफाने दागिने विकत घेतल्याचा आरोप प्रस्तावित करावा, असे चार सुधारित प्रस्ताव न्यायाधीशांसमोर सादर केले. यावर न्यायालयाने आरोपींना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी, आरोपी अॅड. सुरेश चव्हाण याच्यातर्फे अॅड. नामदेव चव्हाण तर सराफातर्फे अॅड. धनंजय माने हे काम पाहत आहेत.
निकम यांचा सोलापूर शहरातील पहिलाच खटला
- विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित खटले चालवले आहेत. खटल्यात बहुतांश आरोपींना फाशी व जन्मठेपेच्या शिक्षा मिळाल्या आहेत. सोलापुरात गाजलेल्या या खून खटल्यासाठी प्रथमच त्यांची नियुक्ती झाली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी त्यांची पंढरपूर येथील धुळा कोळेकर खून प्रकरण व अन्य एका गंभीर गुन्ह्याच्या खटल्यासाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर सोलापूर शहरात खटला चालवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. अॅड. उज्ज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती झाल्याने शहर-जिल्ह्यातील लोकांना निकालाची उत्सुकता वाढली आहे.
खटल्याची पार्श्वभूमी...
- गुलबर्गा येथील मोठी केस देण्याचा बहाणा करून ८ जून २०१९ रोजी आरोपी संजय उर्फ बंटी खरटमल याने अॅड. राजेश कांबळे यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पांडुरंग वस्तीतील स्वत:च्या राहत्या घरी नेले होते. घरात चहामध्ये गुंगीचे औषध घालून पिण्यास दिले. त्यानंतर डोक्यात हातोडा घालून खून केला होता. विल्हेवाट लावण्यासाखी त्याने अॅड. राजेश कांबळे यांच्या शरीराचे सहा तुकडे केले. ते पोत्यात भरून ठेवले, मात्र वेळ आवश्यक असणारे वाहन मिळत नसल्याने प्रेताची विल्हेवाट लावता येत नव्हती. प्रेत घरातच असल्याने त्याची दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस शोध घेत दि. १२ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या घरी गेले. दाराला कुलूप होते, मात्र आतमधून दुर्गंधी येत होती.
पोलिसांना संशय आल्यानंतर दार तोडण्यात आले, तेव्हा पोत्यामध्ये अॅड. राजेश कांबळे यांचे तुकडे केलेले प्रेत आढळून आले होते. बंटी खरटमल याला गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा खून अॅड. सुरेश चव्हाण याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली होती.
- केवळ अॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील लॉकेट, हातातील अंगठ्या आणि खिशातील रोख रकमेसाठी खून केल्याचे सांगितले होते. या प्रकरणी अॅड. सुरेश चव्हाण व सोने विकलेल्या सराफालाही सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. सराफाला जामीन मिळाला आहे, मात्र बंटी खरटमल व अॅड. सुरेश चव्हाण हे दोघे जेलमध्ये आहेत.