सिद्धेश्वर कारखान्याचे गाळप, वीजपुरवठा अन् पाणीपुरवठाही खंडित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:03 PM2021-12-01T18:03:04+5:302021-12-01T18:03:18+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश : प्रदूषण नियंत्रण अन् पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका
साेलापूर : कुमठे (ता. उत्तर साेलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे वारंवार उल्लंघन हाेत आहे. पुढील चार दिवसांत कारखान्याचे गाळप व सहवीज निर्मिती प्रकल्प बंद करण्यात यावा, असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी (पुणे) नितीन शिंदे यांनी कारखान्याला दिले आहेत. वीज वितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागानेही कारखान्याचा वीज व पाणीपुरवठा बंद करावा असेही कळविले.
महापालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक संजय थाेबडे यांनी कारखान्याकडून चिमणी आणि सहवीज निर्मिती प्रकल्पात उभारणीत प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार हरित लवादाकडे केली हाेती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला हाेता. महापालिकेच्या कारवाईविराेधात कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला. थाेबडे यांच्या तक्रारीनंतर हरित लवादाने एका समितीची स्थापना केली. या समितीने कारखान्याची पाहणी केली. कारखान्याची गाळप क्षमता वाढविणेे, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणे यासह विविध कामांवेळी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाले. ही कामे करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही परवाने घेतले नसल्याचा ठपका ठेवत शिंदे यांनी साेमवारी कारखान्याला नाेटीस बजावली. मंगळवारपासून पुढील चार दिवसांत कारखाना बंद करावा असे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत.
---
कारखान्याचे सभासद आणि संचालकांना अंधारात ठेवून अनेक बेकायदेशीर कामे झाली आहेत. कारखान्याची चिमणी बेकायदेशीरपणे उभारली. दहा मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प ३६ मेगावॅट करताना ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगते. एकाही कायद्याचे पालन न करणारे लाेक आपल्या चुकांबद्दल इतरांना दाेष देत आहेत. हरित लवादाकडे तक्रार केल्यामुळे अधिकाऱ्यांनी काेणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करणे गरजेचे आहे.
- संजय थाेबडे, माजी संचालक, सिद्धेश्वर कारखाना.
----
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र मिळाले. त्यानुसार कारखान्याला वीज बंद करण्यात येत असल्याची नाेटीस बजावली आहे. ९६ तासांचा कालावधी पूर्ण हाेताच वीजपुरवठा बंद करू.
- संताेष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण