अतिवृष्टीतील मदतीचे तात्काळ वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:03+5:302021-02-08T04:20:03+5:30
करमाळा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानीची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, ...
करमाळा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानीची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. त्यांनी या मागणीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.
करमाळा तालुक्यातील ३६ हजार ७३७ शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी २० कोटी २१ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यासाठी १४ कोटी रुपये तालुक्यासाठी प्राप्त झाले होते. या रकमेपैकी शेती पिकांसाठी ९ कोटी ८० लाख तर घरांची पडझड, मृत व्यक्ती, जनावरे, शेतजमीन नुकसानीसाठी ४ कोटी ६१ लाखांचे वाटप झाले आहे.
वास्तविक दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या व ३३ टक्के नुकसान झालेल्या जिरायत शेतकऱ्यांना १० हजार तर फळ बागांसाठी २५ हजारांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र काहींना दोन हजार तर काहींना पाच हजार मदत मिळाली. चुकीचे पंचनामे झाल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.
नुकसानीस चार महिने उलटले असतानाही काही शेतकऱ्यांना काहीच मदत मिळालेली नाही. निधी उपलब्ध असून मदत वाटपास चालढकल होत आहे. शेतकऱ्यांत नाराजी आहे.
आठ दिवसांत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला नाही तर तहसील कार्यालयासमोर शिवसेना व शिवप्रताप प्रतिष्ठाणच्या वतीने हालगीनाद आंदोलन करू, असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख फरतडे यांनी दिला आहे.