शेतकऱ्यांना रांगेतून वाटप केले १८० टन युरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:42+5:302021-07-14T04:25:42+5:30
सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२१ - २२साठी सांगोला तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांनी संयुक्तपणे तालुक्यात ...
सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२१ - २२साठी सांगोला तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांनी संयुक्तपणे तालुक्यात सुमारे ३१ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित धरून रासायनिक खते बी-बियाणे कोटा मंजूर झाला आहे. त्यानुसार खरीप हंगाम सन २०२१ - २२साठी युरिया ८९५२, डीएपी ३११५, एसएसपी २२६१, एमओपी १८९६, एनपीके ४३५५ असा एकूण २० हजार ५७३ मे. टन युरिया वाटपाचे नियोजन केले आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यात आत्तापर्यंत १६ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रावर खरीप बाजरी, मका, तूर, उडीद, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे.
पेरणी झालेल्या पिकांची चांगल्या प्रकारे उगवण झाली आहे. अद्याप १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी अपेक्षित असताना गेल्या आठवड्यापासून सांगोला शहर व तालुक्यातील कृषी केंद्रातून रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी कृषी दुकानदारांकडे रासायनिक खते कधी उपलब्ध होतील, अशी विचारणा करीत होते. दोन दिवसापूर्वी आरसीएफ कंपनीची पंढरपूर येथे रँक लागल्याने सांगोल्यासाठी १८० मे. टन युरिया खत उपलब्ध झाले. त्यापैकी सांगोला शहर ४० मे. टन व उर्वरित सांगोला तालुक्यातील कृषी केंद्रांना १४० मे. टन खताचा पुरवठा करण्यात आला.
कृषी केंद्रातून युरिया उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच शेतकरी दुकानांसमोर गर्दी करून रांगेत उभे राहिले होते. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी विकास काळोखे यांनी नियोजन करून सांगोला शहरातील कृषी केंद्रासमोर रांगेतून प्रतिशेतकरी एक पोते याप्रमाणे ४० मे. टन युरियाचे वाटप केले. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळणे सुलभ झाले.
फोटो ओळ ::::::::::::
सांगोला शहरातील कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांनी युरियासाठी भल्या मोठ्या लावलेल्या रांगेचे छायाचित्र