सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाख निराधारांना १२४ कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:38 PM2020-12-07T12:38:32+5:302020-12-07T12:38:38+5:30
एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान १२४ कोटी ८५ लाख ६८ हजार ४५४ रुपयांचे अनुदान वाटप
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एकूण १ लाख ८० हजार ६९५ निराधार, दिव्यांग तसेच वृद्धांना प्रतिमहिना २०० ते १ हजार रुपये इतके शासकीय अनुदान मिळते. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान १२४ कोटी ८५ लाख ६८ हजार ४५४ रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे.
नोव्हेंबरमधील अनुदान वाटप थकीत आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत नोव्हेंबरचेही अनुदान वाटप होईल, अशी माहिती संजय गांधी निराधार योजना विभागाकडून मिळाली आहे. एकूण पाच योजनांतर्गत जिल्ह्यातील निराधार, दिव्यांग तसेच वृद्धांना पेन्शन अनुदानाचे वाटप होते. ६५ वर्षांखालील निराधारांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एक हजार रुपयांचे अनुदान मिळते, तर ६५ वर्षांवरील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत एक हजार रुपयांचे अनुदान मिळते. ७९ वर्षांखालील वृद्धांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेंतर्गत दोनशे ते पाचशे रुपयांचे अनुदान मिळते. तसेच ४० ते ७९ वयोगटातील विधवांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून तीनशे रुपये तसेच राज्य सरकारकडीन ७०० रुपयांचे अनुदान मिळते.
१८ ते ७९ वयोगटातील अपंगांना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून ३०० आणि राज्य सरकारकडून ७०० रुपये अनुदान मिळते.
.............
योजनानिहाय लाभार्थ्यांची संख्या
- संजय गांधी निराधार योजना- ५७,७६२
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना-८८,२४९
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना-३२,३२७
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना-२०४४
- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना-३१३
नोव्हेंबर महिन्याचे अनुदान वाटप करावयाचे आहे. अनुदानासंबंधित आकडेवारी तसेच माहिती तालुक्याकडून मागविले आहे. तालुक्याकडून प्रस्ताव आल्यानंतर सरकारकडे अनुदानाची मागणी करण्यात येईल. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यावर लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वाटप होईल.
- बाळासाहेब शिरसट
तहसीलदार -संजय गांधी निराधार योजना
अनुदान प्रतिमहिना नियमितपणे मिळत नाही. तीन-तीन किंवा चार-चार महिन्यांनंतर एकूण अनुदान मिळते. त्यामुळे तीन ते चार महिने गुजराण करणे मुश्कील होऊन जाते.
- शांता नाईकवाडी
लाभार्थी