सोलापूर जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:31 PM2018-07-13T12:31:13+5:302018-07-13T12:32:24+5:30
रेशन दुकानदारांच्या तक्रारी : कंत्राटदार प्रशासनावर वरचढ
सोलापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना धान्य पुरविणारी यंत्रणा पुन्हा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी रेशन दुकानदार करीत आहेत. शासनाने नेमलेला वाहतूक कंत्राटदार जिल्हा प्रशासनावरच वरचढ झाल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे.
शासनाने आता थेट दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचविण्याची योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना अन्नधान्य पुरवठा करण्याचा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्याचे काम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातही आॅगस्ट २०१७ पासून मुंबईची कंपनी पुरवठा करीत आहे.
शासन निर्देशानुसार दर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत रेशन दुकानांमधून धान्य वाटप होणे अपेक्षित आहे, परंतु आॅक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पुरवठादार थेट तालुक्याच्या गोदामामध्येच धान्य पोहोच करतो. तिथून दुकानापर्यंत घेऊन जाण्यासाठी हमाली आणि वाहतूक खर्च द्यावा लागतो, असेही दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदार आणि पुरवठादाराची बैठकही घेतली होती, परंतु अद्यापही दुकानदारांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरही कागदी घोडे नाचविण्याचे काम होत आहे.
जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आॅक्टोबर २०१७ पासून आजतागायत पुरवठादाराला २७ नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पुन्हा २८ वी नोटीस देत आहोत. वाहतुकीत गोंधळ आणि रेशन दुकानदारांच्या तक्रारी असल्या तरी आजवर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
- रामचंद्र उगले, जिल्हा पुरवठा अधिकारी
आम्ही सर्वप्रकारची वाहतूक यंत्रणा चांगल्या पद्धतीने लावलेली आहे. प्रशासनाने आजवर दिलेल्या सर्व नोटिसींना उत्तरही दिलेले आहे. तालुक्याच्या गोदामाला धान्याची गाडी पाठविल्यानंतर बºयाचदा लवकर रिकामी होत नाही. तिथे हमाल नसतात. गाडी तिथेच थांबून राहते. अनेकदा प्रशासनाकडून परमीटही वेळेवर मिळत नाही. केवळ आमच्याच बाजूने अडचणी आहेत, असे नाहीत.
- रमेश शहा, वाहतूक कंत्राटदार
रेशन दुकानदारांना वेळेवर धान्य मिळत नाही असे आम्ही आॅक्टोबरपासून सांगत आहोत. प्रशासनाला निवेदनही दिले आहे. वेळेवर धान्यच दिले नाही तर आम्ही वेळेवर कसा पुरवठा करणार. प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे अपेक्षित आहे.
- बापू गंदगे, अध्यक्ष, जिल्हा रेशन दुकानदार संघटना