बफर स्टॉकमधील युरियाचे शेतकऱ्यांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:15 AM2021-06-18T04:15:54+5:302021-06-18T04:15:54+5:30
करमाळा : बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक ...
करमाळा : बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक एस.एस. पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे, सुजित बागल आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. बफर स्टॉकमधील युरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोती दिली जात असून, या योजनेचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा, असे अवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र व्होटकर यांनी केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने म्हणाले की, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून शासनाने बफर स्टॉक योजना राबविली आहे. ही योजना काटेकोरपणे राबवली जात असून, उपलब्ध केलेला युरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोती द्यावा व त्याचा संगणक प्रणालीवर अंगठा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याची नोंद ठेवावी, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत.
कृषी विकास अधिकारी शंकर मिरगणे यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर घेणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला. शेतकऱ्यांनीही युरियाचा वापर कमी करून, एनपीके खताचा वापर करावा असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला विदाऊट लिंकिंग दोन पोती युरिया मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया मिळविण्यासाठी मोठी गर्दी केली.
----
फोटो १६ करमाळा
ओळी : बफर स्टॉकमधून शेतकऱ्यांना युरिया वाटप करताना तहसीलदार समीर माने.