'कोरोना'च्या उपचारासाठी मार्कंडेय सहकारी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 07:29 PM2020-05-20T19:29:49+5:302020-05-20T19:30:10+5:30
जिल्हाधिकाºयांचा निर्णय: २00 बेडची व्यवस्था होणार, जिल्हा शल्यचिकित्सकाचे असणार लक्ष...!
सोलापूर : शहरात वाढणाºया 'कोरोना' साथीच्या प्रतिबंधासाठी पूर्व भागातील सहकारी रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी बुधवारी घेतला आहे.
शहरात 'कोरोना'चे रुग्ण वाढतच चालले आहेत. कोरोणाचा संसर्ग रोखणे व बाधीत रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व रिसर्च सेंटर अधिगृहित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत रुग्णालयाने इमारतीसह मनुष्यबळ, जीवरक्षक प्रणाली व यंत्रसामुग्रीसह ताबा महापालिकेला द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संस्थेला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी या ठिकाणी कोव्हिड हॉस्पीटल संबंधीत पर्याप्त व्यवस्था करायची आहे. याबाबत संस्थेने सर्व प्रोटोकॉल पाळून डॉ. ढेले यांना रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच शल्यचिकित्सकांनी वारंवार येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करणे बंधनकारक आहे. या ठिकाणी अॅडमिट होणारे रुग्ण व होणाºया उपचारावर सिव्हिल हॉस्पीटलशी समन्वय राहणार आहे.
जिल्हाधिकाºयांच्या या आदेशान्वये मार्कंडेय रुग्णालयातील २00 बेडची सेवा कर्मचाºयासह आपत्ती व्यवस्थापनकडे वर्ग होणार आहे. कोरोणा संसर्ग झालेल्या रुग्णांना यापुढे या ठिकाणी उपचारासाठी हलविले जाणार आहे. यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामीण रुग्णालय व सिव्हिल हॉस्पीटलची आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
----------------------------
शहरात चौथ्या ठिकाणी सोय....
सिव्हिल हॉस्पीटलनंतर विमा रुग्णालय, रेल्वे हॉस्पीटल, कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयानंतर आता मार्कंडेय रुग्णालयात 'कोरोना'ग्रस्तांवर उपचार होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतर प्रशासनाने कोव्हिड हॉस्पीटलचा प्रस्ताव तयार केला आहे. रुग्ण वाढेल तसे खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे.