खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:46+5:302021-06-05T04:16:46+5:30
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँक १३,१६२ सभासद शेतकऱ्यांना ९९ कोटी खरीप पीक कर्ज वाटप करून जिल्ह्यात अग्रभागी राहिली आहे. ...
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँक १३,१६२ सभासद शेतकऱ्यांना ९९ कोटी खरीप पीक कर्ज वाटप करून जिल्ह्यात अग्रभागी राहिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय, खासगी व सहकारी २० बँकांनी उद्दिष्टाच्या २५.४६ टक्के कर्ज वाटप केले आहे.
मार्च, एप्रिल, मे महिना, तसेच १५ जूनपर्यंत ऊस बांधणे, खत टाकणे व नवीन पिकांसाठी नांगरणी करून रान तयार करण्यात शेतकरी गुंतलेले असतात. यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने बँकेत चकरा माराव्या लागतात.
जिल्ह्यात राष्ट्रीय, खासगी व सहकारी अशा २० बँकांनी २४ हजार ५१० शेतकऱ्यांना ३२३ कोटी ४८ लाख रुपये पीक कर्ज वाटत केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेने मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटत केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १३ हजार १६२ शेतकऱ्यांना ९८ कोटी ९१ लाख रुपये पीक कर्ज वाटत केले आहे. हे इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. बँक ऑफ इंडियाने ४ हजार २४१ शेतकरी सभासदांना ५४ कोटी २२ लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने १७४० शेतकऱ्यांना ३८ कोटी १४ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने १९६१ शेतकऱ्यांना ३३ कोटी ४८ लाख रुपये रक्कम पीक कर्जापोटी वाटप केली आहे.
आयसीआयसीआय बँक ७७० शेतकऱ्यांना २९ कोटी १८ लाख, बँक ऑफ बडोदा ५५० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख, एचडीएफसी बँक ४९१ शेतकऱ्यांना १६ कोटी ६५ लाख, विदर्भ कोकण बँक ६८६ शेतकऱ्यांना ९ कोटी ९२ लाख रुपये, ॲक्सिस बँक १४७ शेतकऱ्यांना ३ कोटी ९४ लाख रुपये, तर इतर बँकांनी अत्यल्प शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे.
---
- खरीप हंगामात एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत एक लाख २० हजार २७९ शेतकऱ्यांना १२७० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- एप्रिल व मे महिन्यात बँकांनी २४ हजार ५१० शेतकऱ्यांना ३२३ कोटी ४८ लाख रुपये कर्ज वाटत केले आहे. उद्दिष्टाच्या २०.३८ टक्के शेतकऱ्यांना २५.४६ टक्के कर्ज वाटप केले आहे.
--
सोलापूर जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांत खरिपाचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. उसाशिवाय खरीप हंगामातील पिकातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची खात्री आहे. उसाचे मागील वर्षीच्या हंगामातील पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. म्हणून बँकांनीच शेतकऱ्यांना कर्ज द्यावे.
- बाळासाहेब पाटील, शेतकरी, कौठाळी