आमदार, राजकीय पुढाऱ्यांसह १७३ शेतकऱ्यांकडे जिल्हा बँकेची २४ कोटी थकबाकी
By admin | Published: June 20, 2017 12:16 PM2017-06-20T12:16:48+5:302017-06-20T12:16:48+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : जिल्हा मध्यवर्ती बँकेची १७३ शेतकऱ्यांकडे तब्बल २४ कोटी ३३ लाख ३७ हजार रुपये इतकी थकबाकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ५३ लाख २५ हजार ३६० रुपये इतकी बाकी आहे.
शासनाने १० लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची नावे जाहीर करा, असा आदेश दिला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने अशा शेतकऱ्यांची यादी केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १० लाखांवरील थकबाकीदार शेतकरी १७३ असून, त्यांच्याकडे २४ कोटी ३३ लाख ३७ इतकी थकबाकी आहे. अक्कलकोट तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ५८ लाख २६ हजार १६२ रुपये, बार्शी तालुक्यातील १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी २४ लाख ३८ हजार ९८५ रुपये,
उत्तर तालुक्यातील चार शेतकऱ्यांकडे ४९ लाख ८९ हजार ३१६ रुपये, करमाळ्याच्या १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी ३७ लाख ९७ हजार ८७९ रुपये, पंढरपूर तालुक्यातील ७ शेतकऱ्यांकडे एक कोटी २१ लाख १४ हजार १५० रुपये, सांगोला तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडे २६ लाख ४७ हजार ८८९ रुपये, माढा तालुक्यातील १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी ११ लाख ७१ हजार ८५८ रुपये, माळशिरस तालुक्यातील ७ शेतकऱ्यांकडे ९५ लाख ५७ हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यातील ९ शेतकऱ्यांकडे एक कोटी १५ लाख ९६ हजार ६५२ रुपये, मोहोळ तालुक्यातील चार शेतकऱ्यांकडे ४८ लाख ७२ हजार इतकी थकबाकी आहे.
--------------------------------
राजकीय पुढारी थकबाकीदार...
एका विद्यमान आमदाराचा भाऊ, एक माजी आमदार, जिल्हा परिषदेचा एक माजी पदाधिकारी याशिवाय अनेक राजकारण्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे मोठी थकबाकी आहे. प्रत्येक तालुक्यात ठराविक चार-पाच गावांतच १० व २० लाखांपेक्षा अधिक रक्कम असलेले थकबाकीदार आहेत.
-------------------------
सहकार खात्याच्या आदेशानुसार १० लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती प्रसिद्ध करण्याचेही आदेश आहेत. शासन आदेशाप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येईल.
- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक