शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा
By राकेश कदम | Published: November 1, 2023 11:32 AM2023-11-01T11:32:17+5:302023-11-01T11:33:04+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात अमाेल शिंदे यांचे कार्यालय आहे.
राकेश कदम, साेलापूर: मराठा आरक्षण आंदाेलनावरुन जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात नाराजी दिसू लागली आहे. मनाेज जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमाेल शिंदे यांनी बुधवारी आपल्या कार्यालयावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांचे फाेटाे असलेला बॅनर हटविला. ‘आधी आरक्षण मग राजकारण’ अशा घाेषणा देत आरक्षण आंदाेलनात उडी घेत असल्याचे अमाेल शिंदे आणि कार्यकर्त्यांनी जाहीर केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात अमाेल शिंदे यांचे कार्यालय आहे. शिंदे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के व अन्य कार्यकर्ते बुधवारी सकाळी १०. ३० च्या सुमाराला या कार्यालयाजवळ जमले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, शिवाजी सावंत यांच्यासह विविध नेत्यांचे फाेटाे असलेले बॅनर हटविण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतरच कार्यालयावर बॅनर लावण्यात येईल. मनाेज जरांगे पाटील अन्न-पाणी न घेता आंदाेलनाला बसले आहेत. या काळात आम्ही बघ्याची भूमिका घेउ शकत नाही. आम्ही राजकारण करू शकत नाही. सरकारला जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाची दखल घेतलीच पाहिजे. अन्यथा उद्रेक हाेईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.