सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पहाटे चार वाजता आला फोन; पुढे काय झालं वाचा बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 12:36 PM2021-05-25T12:36:18+5:302021-05-25T12:36:50+5:30
ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद
सोलापूर - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पहाटे ४ वाजता एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. अवैध वाहतूक करत असल्याने त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनोळखी इसम जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पोलिसांच्या कारवाईची माहिती देत होता. फोनवर तो म्हणाला, साहेब मी अवैध वाहतूक करतोय. त्यामुळे माझ्यावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि मला माझ्या वाहनासह सोडून द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांना नियमानुसार कारवाई करा. त्याचे वाहन जप्त करा, असे सांगितले. त्यामुळे या व्यक्तीचे वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई झाली.
सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता चाळीस पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गस्ती पथकाला विशेष वाहनेदेखील दिली आहेत.
यासोबत ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद करण्यात आले आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.