जिल्हा दूध संघ जागा विक्री, मुंबईची जागा विकण्यास मिळाली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:34+5:302021-08-17T04:27:34+5:30
मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या दूध संघावर कर्जाचा डोंगर आहे. दर महिन्याला केवळ व्याज २५ लाख रुपये द्यावे लागत आहे. ...
मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या दूध संघावर कर्जाचा डोंगर आहे. दर महिन्याला केवळ व्याज २५ लाख रुपये द्यावे लागत आहे. वरचेवर संकलन कमी होत असल्याने दूध विक्रीतून केवळ व्याज भरणेही मुश्किल आहे. त्यामुळे देणे काही केल्या कमी होत नाही. आमदार प्रशांत परिचारक चेअरमन असताना संघाची मुंबईतील जागा विक्रीसाठी परवानगी मिळाली होती. मात्र, काही संचालकांनी विरोध केल्याने जागा विक्री थांबविली होती. त्यानंतर संघावरील कर्जात पुन्हा वाढ झाली. संघ चालविणेच कठीण झाले आहे. प्रशासकीय मंडळाने वाशी मुंबई येथील जागा विक्रीसाठी परवानगी मागितल्यानंतर पुन्हा माजी संचालकांनी विरोध केला आहे. अशातही राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी जागाविक्रीला परवानगी दिली आहे.
-----
अजितदादा म्हणाले, देऊन टाका
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अडचणीत आहे. संघ टिकला पाहिजे, यासाठी वाशी येथील जागा विक्री करणे गरजेचे आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्यानंतर अजितदादांनी परवानगी देऊन टाका, असे सांगितले. त्यानंतर जागा विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. वाशी येथील सिडको वसाहतीलगत १०१६.४७ चौ.मी. जागेत ९८५.८७ चौ.मी. बांधकाम आहे. ई.टी पी. प्लॅटफॉर्म, दोन पॅकिंग मशीन आहे. ही जागा विक्री करून देणी फेडण्याचे प्रशासकीय मंडळाचे नियोजन आहे.
---
संघ चालवायला द्या : माळी
सहकारी दूध संघ टिकला व वाचला पाहिजे. मात्र, दूध संकलन फारच कमी झाले आहे. जागा विक्रीला एक-दोन महिन्यांचा कालावधी लागेल तोपर्यंत सोलापूर जिल्हा संघ गोकुळ अथवा इतर सहकारी दूध संघाला चालवायला देण्याची मागणी माजी संचालक दीपक माळी यांनी केली आहे. कोणीतरी नेतेमंडळींनी संघ वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे माळी म्हणाले.