जिल्ह्यात वादळी पावसाचे तीन बळी
By admin | Published: May 28, 2014 01:07 AM2014-05-28T01:07:27+5:302014-05-28T01:07:27+5:30
पत्रे उडाले : अनेक कुटुंबे बेघर
सोलापूर: रोहिणी नक्षत्राच्या पावसाने दुसर्या दिवशी जिल्ह्यात धुमाकूळ घातला. वीज व वादळामुळे तीन महिलांचा मृत्यू झाला असून घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली. सोलापूर शहर व जिल्ह्यात वादळाने झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या इंदूबाई बंडू सावंत (वय ४५) व सुभद्राबाई सुखदेव सावंत (वय ५२, रा. सांगोला-सावंत वस्ती) या दोघी पाऊस आल्याने झाडाखाली थांबल्या होत्या. झाडावर वीज पडल्याने या दोघी ठार झाल्या. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे पावसाने घराची सिमेंटची चौकट अंगावर पडून कमलाबाई म्हाळाप्पा पडवळे या महिलेचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे सूर्यकांत बारबोले यांच्या शेतात वीज पडून दुभती म्हैस व वासराचा मृत्यू झाला. खंडाळी (ता. मोहोळ) येथे १०० हून अधिक घरांवरील पत्रे उडाले तर विजेचे खांबही उन्मळून पडले. उसाची शेतीही भुईसपाट झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील तुंगत, मगरवाडी, रोपळे बु।।, तारापूर, आष्टी, कौठाळी, येवती, बाभुळगाव व आढीव परिसरात अनेकांच्या घरावरील पत्रे, प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडून गेले आहेत. हे पत्रे उडाल्याने तुंगत (ता. पंढरपूर) येथील एक जण जखमी झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात चपळगाव, चिक्केहळ्ळी, हालहळ्ळी, कर्जाळ (अ) परिसराला फटका बसला. सोलापूर शहरालाही वादळाचा तडाखा बसला. वार्याच्या या तुफानी वेगामुळे डिजिटल फलक फाटून तुकडे तुकडे झाले़ अनेक घरांवरील पत्रे उडाले तर शहरातील विविध भागात सुमारे २०० झाडे उन्मळून पडली़ विजेच्या तारा आणि केबल तुटून रस्त्यावर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला.
-------------
मोहोळ तालुक्यात ऊस पालथा झाला आहे. केळी व द्राक्षाचे सर्वाधिक नुकसान पापरी व खंडाळी गावाला झाले आहे. आपण तातडीने मुंबईला जात असून मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना भेटून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. - लक्ष्मणराव ढोबळे, आमदार